जागर न्यूज : सोलापूर जिल्ह्यासह राज्याच्या अनेक भागात येत्या ४८ तासात अवकाळी पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला असून यामुळे वाढलेल्या तापमानात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे.
उन्हाळ्याचा शेवट होत असतानाच तपमानात मोठी वाढ झाली असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. यावर्षी पावसाळा कसा असेल याबाबत अजूनही भीती व्यक्त होत आहे. उन्हाळ्याचे शेवटचे काही दिवस उरले असले तरी उन्हाळा आणि उकाडा यामुळे लोक त्रस्त झाले आहेत. त्यातच हवामान विभागाने पुढील ४८ तासांचा अंदाज दिला असून अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त केली गेली आहे. राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. यानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागांत 31 मेपर्यंत अवकाळी पाऊस बरसणार आहे.तर, राज्यातील बहुतांश शहरांचा कमाल तापमानाचा पारा चाळीस अंशांपर्यंत घसरला आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. मान्सूनबाबतही दिलासादायक माहिती समोर आली आहे. मान्सूनची आगेकूच होण्यास अनुकूल वातावरण असल्यामुळे येत्या दोन दिवसांत पाऊस अंदमान, निकोबार बेटे आणि बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग व्यापणार आहे.
राजस्थान ते मध्य प्रदेशपर्यंत चक्रिय स्थिती तयार झाली आहे. तर दक्षिण भारताकडून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राकडे वाहत आहेत. या स्थितीमुळे राज्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे. दक्षिण भारतातील काही भागातही पाऊस हजेरी लावणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. राज्याच्या जवळपास सर्वच भागांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस बरसणार आहे. काही भागांत अवकाळी मुसळधार बरसेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद याठिकाणी आज मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. दुसरीकडे हवामान विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मान्सून ४ जूनच्या सुमारास मान्सून केरळमध्ये दाखल होईल.एक जूनपूर्वी मान्सूनचे आगमन होईल अशी अपेक्षा नाही.
यंदा मान्सून सामान्य राहण्याची शक्यता आहे. यंदा पाऊस सर्वसामन्य राहील, अति मुसळधार किंवा पूरजन्य परिस्थिती निर्माण होईल असं सध्यातरी वाटत नाही. जून ते सप्टेंबर या मोसमी पावसाच्या काळात भारतात दीर्घकालीन सरासरीच्या ९६ टक्के पर्जन्यमान अपेक्षित आहे. (Weather forecast of unseasonal rain in Maharashtra) त्यात दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत चार टक्के कमी किंवा जास्त होऊ शकतात. असा अंदाज सद्या तरी व्यक्त करण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा