जागर न्यूज : दोन चार चाकी वाहनांची समोरासमोर धडक होऊन एक जण ठार तर पाच जण जखमी झाले असून जखमीतील एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील महूद ते अकलूज मार्गावर ही दुर्घटना घडली आहे.
महूद ते अकलूज रस्त्यावर चारचाकी वाहनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात कोळेगाव (ता. माळशिरस) येथील एक तरुण वाहनचालक ठार झाला आहे, तर इतर पाच जखमींपैकी एका महिलेची प्रकृती गंभीर आहे. महूद ते अकलूज रस्त्यावर येडगेवाडीपासून जवळ असलेल्या वीटभट्टीसमोर या चारचाकी वाहनांचा समोरासमोर अपघात झाला. कोळेगाव (ता. माळशिरस) येथील एमएच १३, एन ५१७६ या कारमधून पंढरीनाथ पारसे यांच्या कुटुंबातील सदस्यांना घेऊन कारचालक ज्योतिराम बापू सावंत हे कटफळ (ता. सांगोला) येथील एका घरगुती कार्यक्रमासाठी गेले होते.कार्यक्रम उरकून घरी परतत असताना अकलूजहून महूदकडे भरधाव येणाऱ्या एमएच ०९, एफव्ही ८५९३ या दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली.
अत्यंत जोराने झालेल्या या धडकेमुळे दोन्ही वाहनांच्या समोरील बाजू पूर्णतः चुराडा झाल्या. अपघातामध्ये कारचालक ज्योतिराम बापू सावंत (वय ३५) या तरुण वाहन चालकाचा मृत्यू झाला. तर कारमधील इतर पाच प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी सुनीता पंढरीनाथ पारसे (वय ५०) यांच्या डोक्याला व हातापायांना गंभीर मार लागल्याने त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ज्योतिराम सावंत हे कोळेगाव परिसरातील नागरिकांसाठी एक उत्तम सेवा पुरविणारा वाहन चालक होते. दूरवरच्या दवाखान्यांमध्ये रुग्णांना घेऊन जाण्यासाठी नागरिक त्यांना पसंती देत. अशा वाहनचालकाचा अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर आज (शुक्रवारी) दुसऱ्या दिवशी सायंकाळी उशिरापर्यंत या अपघाताची नोंद पोलिसांत करण्यात आली नव्हती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा