जागर न्यूज : महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार असलेले बाळू धानोरकर यांचं निधन झालं आहे. दिल्ली येथील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सकाळी एयर अॅम्बुलन्सद्वारे त्यांचं पार्थिव आणण्यात येईल. यानंतर उद्या वरोरा येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार होणार आहेत.
चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती २८ मे रोजी अचानक बिघडली होती. धानोरकर यांना एयर अॅम्बुलन्सद्वारे नागपूर येथून नवी दिल्लीत उपचारासाठी रवाना करण्यात आले होते. याआधी त्यांच्यावर नागपुरात खाजगी रुग्णालयात किडनी स्टोन शस्त्रक्रिया करण्यात आली होती. २ दिवसांपूर्वी झालेल्या शस्त्रक्रियेदरम्यान त्यांना आतड्याचे इन्फेक्शन झाले. त्यावर अधिक उपचारासाठी नागपूरहून दिल्लीला विशेष एअर ॲम्बुलन्सने रवाना करण्यात आले होते.
बाळू धानोरकर ४७ वर्षांचे होते. मागील तीन दिवसांपासून ते दिल्लीतील मेदांता रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांच्या प्रकृतीत सौम्य सुधारणा होत असल्याचं वृत्त काल समोर आलं होतं. मात्र, पहाटेच त्यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. त्यांचं पार्थिव दुपारी २ वाजेपर्यंत वरोरा येथे आणलं जाणार आहे. तर उद्या ३१ मे रोजी त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जातील, अशी माहिती निकटवर्तीयांनी दिली.
बाळू धानोरकर हे आधी शिवसेनेचे चंद्रपूर जिल्हा प्रमुख होते. त्यानंतर ते कॅाग्रेसमध्ये गेले आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत खासदार झाले. राज्यात कॅाग्रेसचे चे एकमेव खासदार होते. (Congress' only MP Balu Dhanorkar passed away) चार दिवसांपूर्वीच त्यांचे वडील नारायण धानोरकर यांचं निधन झालं होतं. बाळू धानोरकर यांनी वडिलांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं होतं. पण, भद्रावती येथे झालेल्या अंतीम संस्काराला बाळू धानोकर हे उपस्थित राहू शकले नाही. कारण त्यांची स्वतःची प्रकृतीदेखील चांगली नव्हती. शेवटी बाळू यांचे भाऊ अनिल धानोरकर यांनी वडिलांच्या पार्थिवावर अंतीम संस्कार केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा