शोध न्यूज : रुग्णांकडून दोन हजारांची नोट घेण्यास डॉक्टरांनी नकार दिल्याने प्रशासन आक्रमक झाले असून सदर डॉक्टरांच्या विरोधात कारवाई करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
रुग्णाकडील दोन हजार रुपयांची नोट घेण्यास नकार देऊन उर्मट वर्तणुक करणाऱ्या तसेच या नोटेच्या बदल्यात औषध देण्यास नकार देणाऱ्या कान, नाक, घसा तज्ञ डॉक्टर प्रद्युमन वैराट यांच्यावर काेल्हापूर महापालिका आणि अन्न औषध प्रशासन विभागाने कायद्याचा बडगा उभारला आहे.कोल्हापुरातील दसरा चौक परिसरात असलेल्या नाक कान घसा तज्ञ डॉक्टर प्रद्युम वैराट यांचा दवाखाना आहे. काल एक रुग्ण घशाचा त्रास होत असल्याच्या कारणावरून डॉक्टर वैराट यांच्याकडे उपचारासाठी गेले होते. यावेळी डॉक्टरांकडून उपचार झाल्यानंतर डॉक्टरांनी रुग्णाला औषधांची प्रिस्क्रीप्शन दिली.डॉक्टरांनी दिलेली प्रिस्क्रीप्शन घेऊन रुग्णाने आजूबाजूला असलेल्या सर्व मेडिकल दुकानांमध्ये या गोळ्या घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना डॉक्टरांनी दिलेली औषधं ही केवळ त्यांच्या दवाखाना शेजारी असलेल्या केबिन वजा मेडिकल मध्येच मिळतात अशी माहिती मिळाली.त्यामुळे हे रुग्ण पुन्हा त्या रुग्णालय परिसरात असणाऱ्या मेडिकल दुकानामध्ये आले. यावेळी डॉक्टरांच्या औषधाची प्रिस्क्रीप्शन प्रमाणे त्यांना 881 रुपयांची औषध देण्यात आली. औषध मिळाल्यानंतर रुग्णाने आपल्याकडे दोन हजार रुपयांची नोट त्यांना देऊ केली. यावेळी मेडिकल चालकांनी आपण दोन हजार रुपयाची नोट स्वीकारू शकत नाही, आपल्याला औषध हवी असतील तर डॉक्टरांसोबत बोला असे ठणकावून सांगितले.
या संदर्भात या रुग्णांनी डॉक्टरांसोबत बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र 2 हजार रुपयांची नोट आपण स्वीकारत नसल्याचं डॉक्टरांनी सुद्धा सांगितल्याने या रुग्णाला अखेर या डॉक्टरांनी औषध दिली नाही.त्यामुळे रुग्णांने थेट मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री यांच्याकडेच तक्रार दाखल केली. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेचे उपयुक्त रविकांत अडसूळ आणि अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आज या रुग्णालयात जाऊन डॉक्टरांकडे चौकशी सुरू केली. यावेळी बातमीसाठी गेलेल्या माध्यम प्रतिनिधींना देखील सदर रुग्णालयातील महिला डॉक्टरांकडून उर्मट वागणूक देण्यात आली. (Doctor's refusal to take Two thousand note) यावेळी रुग्णालयात लावण्यात आलेल्या अनेक आक्षेपार्ह सूचनांवर अधिकाऱ्यांनी विचारणा केली. आता यावर चौकशी होऊन डॉक्टरवर काय कारवाई होतेय याकडे लक्ष लागले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा