जागर न्यूज : आषाढी वारीसाठी पंढरीकडे येणाऱ्या भाविकांच्या वाहनांना परतीच्या प्रवासासह टोल आकारण्यात येणार नाही अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे, त्यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी चोख नियोजन करण्यात यावे. यंदा वारीसाठी अधिक गर्दी होऊ शकते. त्यामुळे वारकरी बांधवांना कोणतीही अडचण येऊ नये, याची काळजी घ्या, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अधिकाऱ्यांना दिले.वारीसाठी येणाऱ्या वाहनांना परतीच्या प्रवासासह टोल माफ करण्यात येईल, अशी घोषणाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. पंढरीत दर्शनासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना वेळेत दर्शन व्हावे यासाठी विशेष सुविधा करण्यात यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.पंढरपूर आषाढी वारीसाठी निधीची कोणतीही कमतरता नाही. अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे नगरपालिकेसाठीच्या निधीत पाच वरून दहा कोटींची आणि ग्रामपंचायतींकरिता पंचवीस वरून पन्नास लाख रुपयांची अशी दुप्पट तरतूद केली आहे. याशिवाय रस्त्यांसाठीही वेगळा निधी दिला आहे. त्यामुळे रस्त्यांची परिस्थिती सुधारण्याबाबत काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोहोंनीही दिले.
वारी मार्गावरील पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीना देण्यात येणारा निधी दुप्पट केला आहे, तत्काळ वितरीत करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली. पंढरपूर आणि परिसरातील रस्ते वारीसाठी सुस्थितीत व्हावेत यासाठी १० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या निधीतून होणारी कामे वेळेत आणि दर्जेदार व्हावीत यासाठी मंत्रालयीन स्तरावरील नगर विकास विभागाच्या उपसचिवांनी प्रत्यक्ष पंढरपूर आणि क्षेत्रीयस्तरावर पोहचून देखरेख व संनियत्रण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.पंढरीच्या आषाढीच्या वारीच्या अनुषंगाने तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक झाली.''पालख्यांच्या प्रस्थानापूर्वीच वारीसाठीची सर्व सज्जता ठेवा. अशा सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत.
यंदा वारीसाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. वारी मार्गावर पाण्याच्या उपलब्धतेबाबत विशेष नियोजन करावे लागेल. कोणत्याही परिस्थितीत मनुष्यबळ, यंत्रसामुग्रीची कमतरता भासणार नाही, असे चोख नियोजन करा. विभागातील आजुबाजुच्या महापालिका, जिल्हा परिषदा यांच्या यंत्रणाचीही मदत घ्या. वारी मार्गावर ठिकठिकाणी वारकऱ्यांसाठी चांगल्या पद्धतीचे तंबू-निवारे उभे राहतील, पंखे आणि सावली याकरिता काळजी घ्या. वैद्यकीय पथके त्यातील तज्ज्ञ आणि रुग्णवाहिका यांचीही सज्जता ठेवा.''असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले..
औषधे, पिण्याचे पाणी, अन्य आरोग्य सुविधा याबाबत वेळीच नियोजन करा. पंढरपूरमधील रस्त्यांसाठी निधी दिला आहे. त्यातून पंढरपूर नगरपालिका आणि आजुबाजुच्या रस्त्यांचे डांबरीकरण करा. त्यामध्ये नगरपालिकेचा रस्ता, ग्रामपंचायतीचा रस्ता असे हद्दीच्या विषयातून रस्त्यांची कामे मागे ठेवू नका. (Relief for devotees coming for Pandharpur Ashadhi) कोणत्याही परिस्थितीत रस्त्यांवर चिखल किंवा राडा-रोडी दिसता कामा नये याची दक्षता घ्या, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा