जागर न्यूज : पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून सलग सातवेळा निवडून गेलेले कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार संदीपान भगवान थोरात यांचे शुक्रवारी सायंकाळी दीर्घ आजाराने निधन झाले.वयाच्या 91 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
राजकारणापासून दूर राहिलेले थोरात गेल्या अनेक दिवसांपासून हृदयविकारासह पोटाचे विकार आणि श्वसनविकाराने ग्रासले होते. प्रकृती खूपच बिघडल्यामुळे त्यांच्यावर गेल्या 11 मार्चपासून सोलापुरात एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना कृत्रिम जीव संरक्षक यंत्रणेवर ठेवण्यात आले होते. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी रूग्णालयात घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. परंतु अखेर शुक्रवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
सामान्य मातंग समाजातून आलेले आणि गांधी घराण्यावर एकनिष्ठ म्हणून ओळखले गेलेले संदीपान थोरात हे पेशाने वकील होते. ते माढा तालुक्यातील निमगाव येथील मूळ राहणारे होते. तरूणपणीच कॉंग्रेसच्या माध्यमातून ते राजकारणात सक्रिय झाले. 1977 साली कॉंग्रेसच्या पडत्या काळात त्यांना पंढरपूरच्या तत्कालीन लोकसभा राखीव मतदारसंघातून कॉंग्रेसची उमेदवारी मिळाली होती. तेव्हा देशभर जनता पक्षाची लाट असतानाही थोरात हे निवडून आले होते.
यानंतर त्यांनी 1980, 1984, 1989, 1991, 1996 आणि 1998पर्यंत असे सलग सातवेळा पंढरपूर मतदारसंघातून लोकसभेत प्रतिनिधित्व केले होते. दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर त्यांची अढळ निष्ठा होती. (Former Pandharpur MP Sandipan Thorat passed away!) त्यामुळेच त्यांना लोकसभेत प्रदीर्घकाळ प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, चार विवाहित पुत्र, तीन कन्या आणि नातवंडे असा परिवार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा