जागर न्यूज : एकनाथ शिंदे गटाने ठाकरे यांच्याकडील शिवसेना आपल्याकडे घेतल्यानंतर आता शिवसेना भवन आणि पक्षाच्या नावे असलेली संपत्तीही मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिंदे गटाच्या या मागणीने राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडवून दिली आहे.
एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांनी शिवसेनेतून बंद करून भाजप सोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिंदे गटाने शिवसेनेचे नाव आणि निवडणूक चिन्ह मिळवले. अर्थात हे राज्यातील जनतेला फारसे पटले आणि रुचलेले नाही, त्याचा फटका शिंदे गटाला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवसेनेच्या मालकीचे शिवसेना भवन आणि पक्ष निधी यावर आम्ही हक्क सांगणार नाही असे म्हणत असतानाच शिंदे गटाने आता मोठी मागणी करीत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल येत्या काही दिवसात येण्याची शक्यता आहे, त्या आधीच शिंदे गटाने शिवसेना भवन आणि पक्ष निधी मिळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. अर्थात याचे पडसाद रस्त्यावर देखील उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाने धनुष्यबाण आणि पक्षाचे नाव पुन्हा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.याचदरम्यान, एका वकीलाने शिवसेना भवन, सर्व शाखा, सर्व बँकेतील पक्ष निधी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला द्या, यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर २४ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. शिवसेना पक्ष कोणाचा याबाबत निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वीच निर्णय दिला. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. या निर्णयाने उद्धव ठाकरे गटाला चांगलाच दणका बसल्याचे बोलले जात आहे.
यानंतर आता वकील आशिष गिरी यांनी शिवसेना भवन, सर्व शाखा, सर्व बँकेतील पक्ष निधी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला वर्ग करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. वकील आशिष गिरी यांच्या याचिकेतून थेट शिवसेनेच्या संपत्तीवर दावा केला आहे. शिवसेनेच्या मूळ पक्षाकडे मोठा पक्षनिधी आहे. तसेच पक्षाकडे प्रत्येक शहर-गावात कार्यालय आणि शाखा आहेत. शिवसेनेची संपत्तीकडे सुप्रीम कोर्ट कसं पाहतं, हे पाहावे लागणार आहे. शिवसेनेचे मूळ अधिकार शिंदे गटाकडे गेल्यावर पक्षाची संपत्ती देखील त्यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेचा पक्षनिधी शिंदे गटाकडे वर्ग करा, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा