जागर न्यूज : सोलापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढ झपाट्याने होत असून काही दिवसातच जिल्ह्यातील बाधितांची संख्या शंभरीजवळ पोहोचली आहे. भीती बाळगण्यापेक्षा वेळीच घेतलेली काळजीच कोरोनाला आटोक्यात ठेवू शकेल, त्यामुळे नियमांचे पालन करणे आवश्यक बनले आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आलेख दिवसेंदिवस वाढू लागला आहे. काल मंगळवारी एकाच दिवशी २६ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. त्यात शहरातील नऊ तर ग्रामीणमधील १७ रुग्ण आहेत. आता जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ८८ झाली आहे सोलापूर जिल्हा ग्रामीणमधील सर्वच तालुक्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आहेत. अक्कलकोट, बार्शी, करमाळा, मंगळवेढा, उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आहे. मोहोळ तालुक्यात कोरोनाचे दोन रुग्ण सक्रिय असून सर्वाधिक १७ रूग्ण पंढरपूर तालुक्यात आहेत. त्याखालोखाल माढ्यात सात, माळशिरसमध्ये सहा व सांगोला तालुक्यात पाच, असे ग्रामीणमधील एकूण ४३ रुग्ण उपचार घेत आहेत.
ग्रामीणमधील ४३ रुग्णांपैकी बहुतेक रुग्णांना कोणतीही तीव्र किंवा मध्यम स्वरूपाची लक्षणे नाहीत. दुसरीकडे शहरातील एकूण रुग्णांची संख्या आता अर्धशतकाच्या (४५) उंबरठ्यावर आहे. त्यापैकी तीन ते चार रुग्ण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. उर्वरित रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही गंभीर लक्षणे नाहीत. दरम्यान, एका दिवसात पॉझिटिव्ह आलेल्या २६ रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची देखील चाचणी करण्यात आली आली असून त्याचे अहवाल आज मिळतील. बाधित रुग्णांना विशेषतः: ज्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत, पण त्यांच्यात कोणतीही लक्षणे नाहीत, त्यांना सात दिवसांचे होम आयसोलेशन बंधनकारक आहे. त्यांनी वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार घेणे अपेक्षित आहे.
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असले तरी जिल्ह्यातील आठ तालुक्याच्या शहरी भागात मात्र अजूनही कोरोना पोहोचू शकला नाही ही दिलासादायक बाब आहे. अक्कलकोट, बार्शी, करमाळा, माढा, माळशिरस, मंगळवेढा, उत्तर व दक्षिण सोलापूर या तालुक्यातील शहरी भागात कोरोनाचा एकही रुग्ण नाही. मात्र, ग्रामीणमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असून त्याकडे आरोग्य विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. रुग्ण वाढत असले तरी घाबरून जाण्यापेक्षा काळजी घेणे हाच उत्तम मार्ग आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा