जागर न्यूज : आपली मागणी घेवून सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी बैलगाडीचा मोर्चा घेवून मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाकडे निघाला असून आज या आगळ्यावेगळ्या मोर्चाने मुंबईच्य दिशेने कूच केली आहे.
सामान्य जनतेच्या कामासाठी प्रशासकीय यंत्रणा असते परंतु लोकांची जेंव्हा कामे होत नाहीत तेंव्हा ते वेगवेगळ्या प्रकाराने आंदोलने करतात. या आंदोलनाकडेही लक्ष दिले गेले नाही तर लोक थेट मुंबई गाठतात असा प्रकार नित्याचा झाला आहे पण सोलापूर जिल्ह्यातील मंद्रूप येथील शेतकऱ्यांनी बैलगाड्या घेवून मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानावर धडक मारण्याचे नियोजन केले आहे. मंद्रूप येथील शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर ‘एमआयडीसीसाठी आरक्षित क्षेत्र’ अशी झालेली नोंद कमी करावी, यासाठी या शेतकऱ्यांनी आज बैलगाड्यांसह मंद्रूपहून मुख्यमंत्र्यांच्या मुंबई येथील ‘वर्षा’ बंगल्याकडे कूच केली. मंद्रूप येथील नियोजित औद्योगिक वसाहतीसाठी जमीन संपादित करण्यात येणार आहे. मात्र आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या उताऱ्यावर चुकीच्या पद्धतीने ‘एमआयडीसीसाठी आरक्षित’ अशी नोंद झाली आहे. त्याच्या विरोधात गेल्या पाच महिन्यांपासून मंद्रूपच्या तलाठी व ग्रामपंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे.
आंदोलनाकडेही हवे तेवढे लक्ष दिले जात नसून आश्वासनापलीकडे ठोस निर्णय झालेला नाही. यामुळे शासनाच्या विरोधात मंद्रूपचे शेतकरी आक्रमक झाले आहेत. आज मंद्रूप ते मुंबई बैलगाडी मोर्चा काढण्याचा निर्धार आंदोलक शेतकऱ्यांनी केला होता, त्यानुसार आज पाच बैलगाड्यांसह महिला शेतकरी देखील मंद्रूप ते मुंबई बैलगाडी मोर्चात सामील झाल्या आहेत. या मोर्चात आठ महिन्यांच्या अनवी कुंभार या चिमुरडीला घेऊन महिला शेतकरी पाई चालत निघाली आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, आमदार सुभाष देशमुख यांच्यासह प्रशासनातील उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, सहसचिव संजय देगावकर, औद्योगिक विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या भेटी घेऊन नोंद कमी करण्याची विनंती केली; पण उतारावरील नोंद कमी करण्यात आलेली नाही.
शेवटी मुख्यमंत्र्यांच्या मुंबई येथील ‘वर्षा’ या सरकारी निवासापर्यंत बैलगाडी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी प्रवीण कुंभार, गजानन शेंडगे, बाबू मेंडगुदले, अनिल मेंडगुदले, बाळू शेंडगे, मलकारी जोडमोटे, राम कुंभार, बसवराज कुंभार, मलकारी गुंजाटे यांच्यासह महिला व दहा वर्षांच्या आतील लहान बालकांसह शंभर शेतकरी या मोर्चात सामील झाले आहेत. (Solapuri bullock cart march started at Varsha bungalow) शेतकरी दुपारी पावणेबाराच्या सुमारास शेतातून बैलगाडी घेऊन मंद्रूप येथील मळसिद्ध मंदिरात आले. तेथे नारळ वाढवून तलाठी कार्यालयासमोर आले व तलाठी कार्यालयाला नारळ वाढवून शेतकऱ्यांनी शासनाचा निषेध करीत बोंब मारली. बैलगाड्यांसह मंद्रूप तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार राजशेखर लिंबारे यांना नारळ देऊन बैलगाडी मोर्चा मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा