जागर न्यूज : लग्न समारंभातील गर्दीचा फायदा घेवून दागिने चोरणाऱ्या इंडीच्या एका चोरट्यास पकडण्यात पंढरपूर शहर पोलिसांनी यश मिळवले असून पंढरपूर येथील श्रीयश पॅलेस येथून त्याने दागिने आणि मोबाईल पळवला होता.
चोरीच्या अनेक युक्त्या चोर शोधत असतात आणि वेगवेगळ्या युक्त्या वापरत हातोहात चोरी करून पसार होत असतात. पंढरपूर येथे लग्न समारंभाच्या धामधुमीचा गैरफायदा घेत महिलांच्या पर्समधील दागिने लांबविण्याचे काही प्रकार घडले आहेत आणि आता मात्र पोलिसांनी या प्रकरणी इंडी तालुक्यातील शशिकांत गणपत राठोड याला अटक केली असून त्याच्याकडून चोरलेला एक मोबाईल आणि एक तोळे सोने हस्तगत करण्यात आले आहे. (A thief who stole jewelery from a wedding party was handcuffed)जेथे संधी मिळेल तेथे चोरटे आपले 'काम' दाखवत असून सगळीकडेच असुरक्षितता अनुभवाला येत आहे. बंद घरांना चोरटे 'लक्ष' बनवत आहेतच शिवाय रस्त्यावर देखील लुटले जात आहे. बसस्थानकावर बसमध्ये चढ उतर करतांना महिलांच्या पर्स तसेच गळ्यातील दागिने देखील पळवले जात आहेत. लग्नातील गर्दीचा फायदा उठवून हातोहात दागिने पळवले जात आहेत.
पंढरपूर येथील श्रेयश पॅलेस येथे सुनीता संजय गायकवाड (रा. माढा), आणि पंढरपूर येथील निलावती बोडके यांचे मोबाइल व सुनीता यांचे एक तोळा वजनाचे मणीमंगळसूत्र असे संगीता थिटे यांच्या पर्समध्ये ठेवले होते. त्या दिवशी दुपारी अडीचच्या सुमारास संगीता यांनी पर्स सोफ्यावर ठेवली व त्या पाहुण्यांशी बोलत असताना पर्स अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. हा प्रकार लक्षात येताच पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद देण्यात आली होती. पंढरपूर पोलीस या घटनेचा तपास करीत होते. याबाबत पंढरपूर गुन्हे प्रकटीकरण शाखेने शशिकांत गणपत राठोड (वय ३७, पत्ता केसराल इंडी, जि. विजापूर) याला ताब्यात घेऊन चौकशी केली. यावेळी तो लग्नाची गर्दी असताना आला अन् दोन मोबाइलसह सोन्याचे दागिने पळविले असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना सांगितली. त्याच्याकडून चोरीला गेलेला एक मोबाइल व १० ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले आहे. शशिकांत राठोड याला न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली
या आधीही असाच प्रकार घडला होता. श्रीयश पॅलेस येथे कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील मुलगा विपुल शिराळकर आणि अकलूज येथील मुलगी सुरभी जोशी यांचा विवाह आयोजित करण्यात आला होता. दोन्ही बाजूचे वऱ्हाडी मंडळी विवाहासाठी जमले होते. विवाह सोहळ्याची धामधूम सुरु असतानाच नवरदेव मुलगा विपुल याची आई प्रीती किरण शिराळकर यांच्या दागिन्यांची बॅग गायब झाली असल्याचे लक्षात आले आणि एकच गोंधळ उडाला. श्रीमंत पूजनासाठी घातलेली दागिने त्यांनी काढून आपल्या पर्समध्ये ठेवले आणि लग्नासाठी म्हणून दुसरे दागिने घातले. थाटामाटात आणि उत्साहात विवाह सोहळा संपन्न देखील झाला पण नंतर मात्र चोरीची बाब उघडकीस आली. प्रीती शिराळकर यांना काही पैशाची आवश्यकता होती म्हणून त्यांनी आपल्या पर्समधून पाचशे रुपये काढून घेतले आणि पर्स सोफ्यावर ठेवून शेजारीच त्या बसल्या. दरम्यान त्यांची पर्स चोरीला गेली. दागिने, रोख रक्कम, मोबाईल असलेली पर्स चोराने हातोहात लांबवली होती.
चोरीस गेलेल्या या पर्समध्ये ३१ हजाराची रोख रक्कम, ११३ ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच पाच भार चांदी असा ऐवज होता. ६ तोळ्याचा सोन्याचा नेकलेस, अडीच तोळ्याचा सोन्याचा नेकलेस, ११ ग्रॅमची एक जोड सोन्याची कर्णफुले,५ ग्रॅमचे सोन्याचे कानातील वेल, १२ ग्रॅमचे सोन्याचे छोटे मंगळसूत्र, चांदीचा करंडा आणिरोख ३१ हजार रुपये असा एकूण ४ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल चोरीस गेला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा