जागर न्यूज : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील जगदंबा नगरमध्ये स्त्री शक्तीचा जागर आणि महिलांचा आनंदाचा मेळा पाहायला मिळाला. यावेळी तमाम महिलांचा उचित सन्मान करण्यात आला.
सामाजिक कार्यात नेहमीच रस घेणारे आणि प्रत्येकाच्या हाकेला विनम्र प्रतिसाद देणारे पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीचे सदस्य सागरभैय्या सोनवणे यांनी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता. जगदंबा नगर येथे झालेल्या या सन्मान सोहळ्यात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. मागील काही काळापासून महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर असून काही प्रसंगी त्यांनी पुरुषापेक्षाही उजवे काम करून दाखवले आहे. समाजाच्या प्रगतीत महिलांचा अनमोल वाटा असून पुरुषांनी त्यांच्या प्रति आदरभाव व्यक्त करण्याची नितांत गरज आहे. महिलांचा अखंड सन्मान होण्याची गरज आहे त्यामुळे महिला दिनाचे औचित्य साधून हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला असल्याचे आयोजक सागर सोनवणे यांनी सांगितले.
अत्यंत आनंदात आणि उत्साहात साजरा झालेल्या या सन्मान सोहळ्यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून अमृता प्रणव परिचारक आणि कुमारी उज्ज्वला बहेनजी उपस्थित होत्या तर ग्रामपंचायत सरपंच विजयमाला वाळके, सदस्य रुपाली कारंडे, डॉ. साक्षी घोगरदरे, एड. कांचन देशमाने, डॉ. सुप्रिया धायतडक, वैष्णवी महिला बचत गटाच्या उपाध्यक्षा अंजली सोनवणे, निकिता सोनवणे या उपस्थित होत्या. या सन्मान सोहळ्याला नारी शक्तीचा एक वेगळा उत्साह ओथंबून आला होता. आयोजकाच्या वतीने उपस्थित असलेल्या सर्व महिलांचा आणि मुलींचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला. समाजातील प्रत्येक महिला ही सन्मानायोग्यच असल्याने सर्वच महिलांचा उचित सन्मान या सोहळ्यात करण्यात आला. महिलांनीही महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा तर दिल्याच पण या सोहळ्याला एक आनंदाच्या मेळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.
सोन्याची नथ !
महिला सन्मान मेळाव्याच्या निमित्ताने महिलांसाठी संगीतखुर्ची स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात अनेक महिला सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक असलेली सोन्याची नथ आशाताई मेश्राम यांनी पटकावली तर द्वितीय पारितोषिक असलेली पैठणी रुक्मिणीताई चाटे यांनी पटकावली. या स्पर्धेने या सोहळ्यात खेळीमेळीचे वातावरण निर्माण केले होते.
यावेळी बोलताना कुमारी उज्वला बेहनजी यांनी महिलांना शुभेच्छा देत मोलाचे मार्गदर्शन केले. पुरातन संस्कृतीपासून नारीला महत्वपूर्ण स्थान असून सर्व प्रकारचे धक्के सहन करण्याची शक्ती स्त्री मध्ये आहे. स्त्री ही घराची रक्षक आणि पालनकर्ती असते ज्या घरामध्ये स्त्रीला मान आहे ते घर उन्नतीच्या शिखरावर आहे प्रत्येक महिला ने आपल्या घरातील लक्ष्मी बनून आपल्या घराला स्वर्ग बनवला पाहिजे घरातील व्यक्तींना शुद्ध सात्विक आहार दिला पाहिजे, मुलांवर चांगले संस्कार घडवण्याची जिम्मेवारी मातावरच आहे आई मुलाला बोलायला तर शिकवते पण काय बोलावे काय बोलू नये हे शिकवलं पाहिजे स्त्रीची खरी सुंदरता तिच्या स्वभावात व गुणात आहे, दिसायला नुसतं सुंदर असून उपयोग नाही असे कुमारी उज्जाला बहेनजी यांनी सांगितले. विचारांची सुंदरता हीच खरी सुंदरता आहे त्यामुळे प्रत्येक स्त्रीने चांगले विचार जपावेत असे आवाहन त्यांनी केले.
एड. कांचन देशमाने यांनी, महिलांनी कायद्याचा गैरवापर न करता आपल्यावर झालेल्या अथवा होत असलेल्या अन्याय, अत्याचार याच्याविरुद्ध लढा देण्याचा प्रयत्न करावा. आवश्यक तेंव्हा कायद्याचा आधार घ्यावा असे आवाहन केले. (Mahila Shakti Jagar, Honor Ceremony in Takli Suburb) अत्यंत खेळीमेळीत आणि आपलेपणाच्या भावनेने संपन्न झालेल्या या सन्मान सोहळ्यात सगळ्याच महिला रमून गेल्या होत्या. अल्पोपहारामुळे कार्यक्रमात औपचारिकपणा कुठेच जाणवला नसल्याने उपस्थित महिलांनी आनंद व्यक्त केला.
या सन्मान सोहळ्याचे सूत्रसंचालन राजू रणदिवे यांनी केले तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर कारंडे, सुरज भिंगारे, अनिल सोनवणे यांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा