जागर न्यूज : पंढरपूर - मोहोळ तालुक्यासाठी उपयुक्त असलेल्या आष्टी तलावासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात चाळीस कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष रणजीत चवरे यांनी दिली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील आष्टी तलाव हा मोठा तलाव असून या तलावात पाण्याची साठवण देखील चांगली होत असते परंतु या तलावाची दुरवस्था झाली असल्याने नागरिक आणि शेतकरी यांच्यात नाराजी होती. या तलावाची दुरुस्ती व्हावी अशी मागणी सातत्याने होत होती आणि आता ही मागणी मार्गी लागल्याचे दिसत असून आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्याकडे यासाठी याबाबत पाठपुरावा केला होता. राज्याच्या अर्थसंकल्पात या तलावासाठी तब्बल चाळीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती आता समोर आली आहे त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. मोहोळ तालुक्यात आष्टी तलाव प्रसिद्ध आहे. या तलावाची निर्मिती ब्रिटिश कालीन राणी व्हिक्टोरिया यांनी केली होती.
पावसाच्या पाण्यावरील हा तलाव आष्टी, रोपळे, येवती या गावातील दोन हजार पाचशे हेक्टर क्षेत्रावर उभारला आहे. त्याची पाणी साठवण क्षमता एक टीएमसी इतकी आहे. या तलावाची अत्यंत दुरावस्था झाली असून, पडझड झाली आहे. भराव्याला भेगा पडल्या आहेत. मोठ-मोठी काटेरी झुडपे वाढली आहेत. त्यामुळे या तलावाला धोका होऊ शकतो. गेल्या अनेक वर्षापासून या तलावाची देखभाल व दुरुस्ती झाली नाही. या तलावावर सध्या सुमारे २३ हजार हेक्टर क्षेत्र बागायती आहे, तर सहा ते सात पिण्याच्या पाण्याच्या योजना कार्यान्वित आहेत.
नागपूरच्या अधिवेशनात मोहोळ तालुक्यातील आष्टी उपसा सिंचन योजनेसाठी व आष्टी तलाव दुरुस्तीसाठी आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी शंभर कोटी रुपयांची मागणी केली होती. दरम्यान कालच्या बजेट मध्ये तलाव दुरुस्तीसाठी चाळीस कोटी रुपयांची तरतूद आमदार मोहिते पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे झाली असल्याचे चवरे यांनी सांगितले. (Forty crores sanctioned in the budget for Ashti Lake) या तलावाच्या दुरुस्ती नंतर तलावाचे पुनरुज्जीवन होणार असून, पाणीसाठा वाढणार आहे. परिणामी बागायती क्षेत्र व फळबागाचे क्षेत्र ही वाढणार आहे. चाळीस कोटी रुपये मंजूर झाल्याचे समजतात खंडाळी, पापरी, येवती, आष्टी, रोपळे, पेनुर या गावातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. पाठपुरावा करून निधी मंजूर केल्याबद्धल आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचेही धन्यवाद व्यक्त केले जात आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा