शोध न्यूज : पूर्णपणे कोरोनामुक्त झालेल्या सोलापुरात पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून एका डॉक्टरांच्या संपर्कातून तब्बल आठ जणांना कोरोनाची लागण झाली असल्याची बाब समोर आली आहे.
कोरोनाच्या आक्रमणात सोलापूर जिल्हा हा राज्यात पहिल्या दहा जिल्ह्यात राहिला असून कोरोनाने सोलापूर जिल्ह्याला वेढले होते. सोलापूर जिल्ह्याचे अपरिमित नुकसान कोरोनाने केले होते. अखेर एक दिवस कोरोना पूर्णपणे परतला आणि सोलापूर जिल्हा पुन्हा एकदा कोरोनामुक्त झाला. सोलापूर जिल्ह्यातून कोरोन हद्दपार झाल्यावर जिल्हाभर दिलासा लाभला असून नागरिक पुन्हा कोरोनापुर्वीचे जीवन जगू लागले आहेत. कोरोनाची पुढची लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती त्यावेळी सोलापूर जिल्हा कोरोनातून मुक्त होताना दिसत होता. भयानक उत्पात घडवलेला कोरोना सोलापूर जिल्ह्यातून पूर्णपणे गेला असताना आता पुन्हा त्याची चाहूल लागली असून दक्ष राहण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. कोरोनामुक्त झालेल्या सोलापूर शहरात मागील दोन दिवसांत कोरोनाचे १४ रुग्ण आढळले आहेत. सोलापुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एका कोरोना पॉझिटिव्ह डॉक्टरांच्या संपर्कातून आठ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर उर्वरित सहा रुग्ण शहरातील विविध भागातील आहेत. त्या रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे असून त्यांना सात दिवस होम आयसोलेशनमध्ये राहावे लागणार आहे.
दोन महिन्यांपासून कोरोनाचा एकही रुग्ण नसलेल्या सोलापूर शहरात दोन दिवसातच रुग्णसंख्या १४ झाली आहे. ३ मार्च रोजी एक महिला पॉझिटिव्ह आढळली होती. त्यानंतर त्यांच्या संपर्कातील एकूण ७० संशयितांची टेस्ट करण्यात आली. त्यावेळी आठजण पॉझिटिव्ह आढळले. सोमवारी शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दहा झाली होती.मंगळवारी ७ मार्च रोजी सोलापूर शहरातील सक्रिय रुग्णसंख्या १३ झाली होती. बुधवारी आणखी एक महिला कोरोना बाधित आढळल्याने शहरात सद्यःस्थितीत दहा महिला व चार पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आहेत. (Corona patients were found again in Solapur district) कोरोना बाधित आढळलेल्या रुग्णांमध्ये तीव्र किंवा मध्यम स्वरूपाची लक्षणे नाहीत. मेडिकल कॉलेजमधील बाधितांपैकी चार जणांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले.
बाधित झालेले सर्वजण बरे असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. बसवराज लोहारे यांनी दिली. दरम्यान, कोरोनाचे रुग्ण वाढल्याने कोणीही घाबरून जाऊ नये, पण नियमांचे तंतोतंत पालन करणे जरुरी असल्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. दुसरीकडे तीन दिवसांपूर्वी सांगोला ग्रामीणमध्ये कोरोनाचा एक रुग्ण आढळला होता. तो आता बरा होऊन घरी परतला आहे. कोरोना टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांना त्यांच्या स्वतः:च्या घरी उपचार घेण्यास परवानगी आहे. पण, त्यांनी तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेण्याचे बंधन आहे. तसेच सात दिवस त्यांना त्यांचे घर किंवा खोली सोडून इतरांच्या संपर्कात येण्यावरही निर्बंध आहेत. जेणेकरून दुसरे कोणी त्यांच्यापासून बाधित होणार नाहीत, हा त्यामागील हेतू आहे. घाबरून जाण्यापेक्षा काळजी घेणे हे केंव्हाही चांगले मानले जाते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा