जागर न्यूज :- सोलापूर जिल्ह्यातील चोरांनी आता ताळतंत्र सोडल्याचे दिसत असून गोत्य्ह्यात बांधलेल्या गाईसुद्धा चोरून नेण्याची घटना घडली आहे.
बंद घरात घुसून चोऱ्या होतातच पण रस्त्यावर देखील वेगवेगळ्या पद्धतीने लुटले जाते. राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करताना आणि चढता उतरतानाही चोरी केली जाते. सायबर क्राईम तर अगदीच टोकाला गेले आहे आणि कुणालाही हातोहात फसवले जात आहे पण आता गोठ्यातील जनावरे देखील सुरक्षित राहिली नाहीत हे दाखवणारी एक घटना मोहोळ तालुक्यातून समोर आली आहे. गोठ्यात बांधलेल्या पावणेदोन लाख रुपयांच्या तीन जर्सी गायींची चोरी झाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री देवडी शिवारात घडली. याबाबत आज्ञात चोरट्या विरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
मोहोळ तालुक्यातील देवडी येथील आकाश भारत थोरात हे देवडी शिवारातील त्यांच्या शेतात राहतात. त्यांचा दुग्ध व्यवसाय आहे. गुरुवारी रात्री साडेअकरा वाजता नेहमीप्रमाणे जेवण खान करून थोरात हे गायींना चारा टाकून झोपले. रात्री दोन वाजता त्यांना जाग आली असता त्यांनी गायींच्या गोठ्याकडे जाऊन पाहिले.त्यांना सात गायी पैकी दोन गायी बांधलेल्या ठिकाणी आढळून आल्या नाहीत. (A farmer's cow was stolen in the middle of the night.) त्यामुळे थोरात यांनी गोठ्याच्या आजूबाजूच्या परिसरात गायींचा शोध घेतला, परंतु गायी दिसून आल्या नाहीत. त्यानंतर आकाश याने वडील भारत यांना उठविले व झाला प्रकार सांगितला.
आकाशचा चुलत भाऊ रोहित अशोक थोरात हा त्यांच्या शेजारीच राहतो. त्याला उठवून आमच्या दोन गाई बांधलेल्या ठिकाणी नसल्याचे आकाश याने सांगीतले. रोहितला शंका आल्याने त्यानेही त्याच्या गोठ्यात जाऊन पाहिले असता सहापैकी त्याचीही एक गाय बांधलेल्या ठिकाणी आढळून आली नाही. दोघांनी मिळून पुन्हा परिसरात गायींचा शोध घेतला परंतु, गाई कुठेच दिसून आल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या एक लाख सत्तर हजाराच्या तीन गायींची चोरी झाल्याची खात्री झाली. याबाबत आकाश भारत थोरात यांनी मोहोळ पोलिसात फिर्याद दिली असून अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल चव्हाण करीत आहेत. गाई देखील चोरीला गेल्याने परिसरात चर्चा सुरु असून आता अशा चोरांना करायचे तरी काय ? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा