जागर न्यूज - वाळू तस्करांची मुजोरी पुन्हा एकदा समोर आली असून कारवाईसाठी ताब्यात घेतला वाळू चोरीचा ट्रॅक्टर पथकाला धक्काबुक्की करीत पळवून नेल्याची घटना सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात घडली आहे.
मोहोळ तहसीलदारांच्या वाळु चोरी विरोधी पथकाने कारवाई साठी ताब्यात घेतलेला ट्रॅक्टर कर्तव्यावर असलेल्या कोतवालाला दमदाटी, धक्काबुक्की, शिवीगाळ करून दोघांनी पळवून नेल्याची घटना ता 24 मार्च रोजी पहाटे साडेतीन वाजता मोहोळ येथील शासकीय गोदाम आवारात घडली. या प्रकरणी दोघा विरोधात मोहोळ पोलिसात शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. दत्तात्रेय प्रभाकर काळे, सिताराम दगडू यलगुंडे दोघे रा. विरवडे बुद्रुक, ता. मोहोळ अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, मोहोळ तालुक्यातील अवैध वाळू वाहतूक प्रकरणी कारवाईसाठी आणलेली वाहने येथील शासकीय गोदाम आवारात आणून लावली जातात. ता. 17 मार्च रोजी विरवडे गावचे हद्दीतील सीना नदी पात्रात बेकायदा वाळू चोरून उपसा करताना दतात्रय काळे यांचा बिगर नंबर चा ट्रॅक्टर पथकाला आढळुन आला. तो बिगर नंबरचा ट्रॅक्टर मोहोळ येथे दंडात्मक कारवाई करण्यासाठी शासकीय गोदाम आवारात आणून उभा केला होता.
दिनांक 23 मार्च रोजी कोतवाल गणेश मच्छिंद्र पवार हे गोदाम कर्तव्यावर असताना रात्रीच्या वेळी सर्व वाहनावर देखरेख करून गोदामाच्या मुख्य गेट जवळ ते खुर्ची टाकून बसले होते. ता. 24 मार्च रोजीच्या पहाटे सव्वातीन वाजता प्रभाकर काळे व सिताराम येलगुंडे हे दोघे मुख्य गेट उघडून आत आले. पवार यांनी इतक्या रात्री या ठिकाणी कशासाठी आला आहात अशी विचारणा केली असता वाळू चोरी प्रकरणात आमचा ट्रॅक्टर इथे आणून लावला आहे. तो घेऊन जाण्यासाठी आलो असल्याचे त्या दोघांनी सांगितले.
पवार यांनी तुम्ही तहसीलदार यांना भेटून, रितसर दंड भरून नंतर वाहन घेऊन जावा तो पर्यंत मी ट्रॅक्टर घेऊन जाऊ देणार नाही असे सांगितले. त्यावेळी दत्तात्रय काळे यांने पवार यांच्या गच्चीला धरून ठेवले, सिताराम येलगुंडे यांने धक्काबुक्की करून खाली पाडले व रात्री साडेतीन वाजता ट्रॅक्टर घेऊन दोघे जण पळून गेले. (Bullying of sand thieves, tractor ran away in Solapur district) याप्रकरणी कोतवाल गणेश मच्छिंद्र पवार यांनी मोहोळ पोलिसात फिर्याद दिली असून अधिक तपास मोहोळ पोलीस करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा