जागर न्यूज : सोलापूर जिल्ह्यातील सरकारी दवाखान्यात गैरहजर राहणाऱ्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मोठे इंजेक्शन दिल्याने कामचुकार वैद्यकीय अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे सतत प्रशासनाची गाडी रुळावर आणण्यासाठी प्रयत्नशील असतात. अनेक विभागांना त्यांनी शिस्तही लावली आहे परंतु ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात अनेकदा डॉक्टर महाशय हजर नसतात तसेच ग्रामीण भागातील सरकारी दवाखान्याबाबत जनतेच्या तक्रारी सुरूच असतात. काही डॉक्टर नावाला सरकारी दवाखान्यात येतात आणि आपली खाजगी प्रक्टिस करण्यातच त्यांना अधिक रस असतो. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत असते परन्तु आता अशा कामचुकार डॉक्टरांना मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी चांगलेच 'इंजेक्शन' दिले असून कामचुकार मंडळी 'सलाईन' वर आले आहेत.
ग्रामीण भागातील प्रसुती शासकीय रुग्णालयात होण्याच्यादृष्टीने प्रयत्न करा. शासकीय रुग्णालयात चांगल्या सेवा द्या. रुग्णांच्या तक्रारी येऊ देऊ नका. सातत्याने गैरहजर वैद्यकीय अधिकाऱ्यांची यापुढे गय केली जाणार नाही. त्यांना थेट घरचा रस्ता दाखविणार असल्याचा इशारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिला.जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात शुक्रवारी जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक स्वामी यांनी घेतली. बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे, जिल्हा लसीकरण अधिकरण अधिकारी डॉ. अनिरुध्द पिंपळे, डॉ. दीपक कुलकर्णी, डॉ. मीनाक्षी सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रामीण भागातील
लोकसंख्या व आर्थिक स्थिती विचारात घेता शासकीय रुग्णालये व उपकेंद्रात आरोग्याच्या चांगल्या सुविधा द्या. आरोग्य केंद्रात अचानक भेटी द्या. 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' चे कार्यक्रम घ्या अशा सूचना स्वामी यांनी केल्या. खासगी शाळेतील मुले जिल्हा परिषद शाळेत येत आहेत. याप्रमाणे शासकीय दवाखान्यातही रुग्ण आले पाहिजे. (Warning to government doctors in Solapur district) मुलांची तपासणी वेळेत पूर्ण करा. यासाठी मोठ्या ग्रामपंचायतीची निवड करा, असे आवाहन डॉ. कुलकर्णी यांनी केले. गरोदर मातांची काळजी घेतली तर ० ते पाच वयोगटातील बालमृत्युदर कमी करता येईल, असे डॉ. पिंपळे यांनी सांगितले.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनाली बागडे यांनी सर्व वैद्यकीय अधिकारी यांनी मुख्यालयात राहा. आरोग्य केंद्राचा परिसर स्वच्छ ठेवा. आरोग्य केंद्रात चांगली सेवा द्या, असे सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा