जागर न्यूज : उन्हाळ्याला सुरुवात झाली असून अजून कडक उन्हाळ्याची प्रतीक्षा असतानाच त्यापूर्वीच उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला असून भविष्यातील उन्हाळ्याची चिंता यामुळे वाढली आहे.
यंदाचा उन्हाळा हा अधिक तीव्र असण्याची शक्यता आधीच व्यक्त केली गेली असून आता उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच उष्णतेच्या लाटेचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये फेब्रुवारीतच तापमानाचे विक्रम मागे पडू लागले असून उन्हाळा सुरू होण्याआधीच उष्णतेच्या लाटेचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे.येत्या तीन दिवसांत तापमानात मोठी वाढ संभवते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भ अशा सर्व विभागांमध्येच कमाल तापमानाने ३० अंश सेल्सिअसची पातळी ओलांडली आहे. जळगाव सोडल्यास इतरत्र किमान तापमानही वाढत आहे. त्यामुळे राज्यभर उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढत जाणार असल्याचे चित्र आहे. दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्यांचे तापमान आधीचे विक्रम मोडीत काढीत आहे. उत्तर-पश्चिम भारत, मध्य भारत आणि पूर्व भारतात पुढील तीन दिवसांत कमाल तापमानात तीन ते पाच अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज आहे. देशाच्या अनेक भागांत ही तापमानवाढ संभवते. उन्हाळय़ाची सुरुवात मार्चमध्ये होते, मात्र यंदा फेब्रुवारीतच उन्हाचे चटके बसू लागले आहेत. सध्या वायव्य भारतातील कमाल तापमानात लक्षणीय बदल होण्याची शक्यता नाही. मात्र, त्यानंतर तापमान वाढण्याचा अंदाज आहे. मार्चच्या पहिल्या पंधरवडय़ातच वायव्य भारतातील काही ठिकाणी पारा ४० अंश सेल्सिअस आणि त्याहून अधिक चढू शकतो.
राज्यातील सर्वात कमी कमाल तापमान मुंबई (३२.६), डहाणू (३१.२) आणि महाबळेश्वर (३१.४) येथे नोंदवण्यात आले आहे. पुणे (३५.१), नाशिक (३५.१), सांगली (३५.६), सातारा (३५.४), सांताक्रूझ (३५.५), औरंगाबाद (३५.४), बुलढाणा आणि यवतमाळमध्ये (३५.५) तर नागपूरमध्ये (३५.२) एवढे कमाल तापमान नोंदवण्यात आले आहे. जळगाव, सोलापूर, परभणी, नांदेड, अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा या भागांमध्ये तापमानाने ३५ अंश सेल्सिअसचा पाराही ओलांडल्याचे शनिवारी दिसून आले आहे. (Meteorological department predicts heat wave) पुणे (१२.५), जळगाव (९.७) आणि औरंगाबाद (१२.६) सोडल्यास इतर सर्व ठिकाणी किमान तापमानाने १५ अंश सेल्सिअसची पातळी ओलांडली आहे.
हिवाळय़ात या वर्षी बऱ्याच ठिकाणी किमान तापमानात मोठी घट झाली होती. अनेक राज्यांमध्ये किमान तापमान एकांकावर आले होते. त्यामुळे अनेक भागांमध्ये गारठवणाऱ्या थंडीचा अनुभव नागरिकांनी घेतला. यंदाचा उन्हाळाही तीव्र असू शकतो, असा अंदाज आहे.विदर्भातील अनेक शहरांचे कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या वर गेले आहे. किमान तापमानदेखील १७, १८ अंश सेल्सिअस आहे. अकोला जिल्ह्यातील कमाल तापमान ३८.२ अंश सेल्सिअय आहे. अमरावती, ब्रह्मपुरी, वर्धा, वाशीममध्ये कमाल ३७, तर चंद्रपूर, गोंदिया, नागपूरमध्ये ३६ अंश सेल्सिअसवर आहे.गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक ठिकाणी दिवसभर उन्हाच्या झळा आणि रात्रीपासून पहाटेपर्यंत थंडी असे विषम हवामान होते. आता या परिस्थितीत बदल होत असून दिवसा आणि रात्रीही उकाडय़ाचा सामना करावा लागणार असल्याचे हवामान विभागाने प्रसिद्ध केलेल्या माहितीवरून स्पष्ट होत आहे. येत्या तीन दिवसांत तापमानात मोठी वाढ होण्याचा अंदाज आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा