जागर न्यूज : चंद्रभागेच्या पात्रात वाळू तस्करीचे आणखी दोन बळी गेले असून काल भीमा नदीच्या पात्रात पुन्हा एकदा दोन व्यक्तींचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे.
भीमा नदीत आजवर अनेकांचा बुडून मृत्यू झाला असून अशा घटना सतत घडत आहेत. वाळूचोरांनी चंद्रभागेच्या पात्रात जागोजागी खड्डे केले असून पाण्यामुळे हे खड्डे दिसत नाहीत आणि अचानक या खड्ड्यामुळे भाविकांचा बुडून मृत्यू होत असल्याचा घटना सातत्याने घडत आहेत. चंद्रभागा नदीपात्रात सातत्याने वाळू चोरी सुरू असते. त्यामुळे नदीत जागोजागी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. उजनी धरणातून पाणी सोडल्यानंतर खड्यांसह नदीपात्र भरते. त्यामुळे पाण्यातील खड्यांचा अंदाज भाविकांना येत नाही. परिणामी स्नान करण्यासाठी गेल्यानंतर पाण्यातील खड्यांमध्ये बुडून भाविक मयत होण्याच्या घटना वारंवार घडतात. बुधवारी पुन्हा दोन भाविकांना प्राण गमवावे लागल्याने सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला.
सातारा जिल्ह्यातील मायणी येथील आप्पासाहेब आनंद जाधव या भाविकाचा आणि अन्य एका व्यक्तीचा काल एकाच दिवशी भीमा नदीच्या पात्रात वाळू उपशाच्या खड्ड्यामुळे बुडून मृत्यू झाला आहे. आप्पासाहेब आनंद जाधव आणि अन्य एक व्यक्ती अशा दोघांचा बळी अवैध वाळू उपशाने घेतला आहे. एक अनोळखी पुरूष भाविक दगडी पुलाजवळील चंद्रभागेत स्नानासाठी गेलेला असताना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मयत झाला. याबाबत सुरज अरूण कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मयत अशी नोंद झाली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर पुन्हा काही वेळाने कुंभार घाटाजवळील नदीपात्रात आप्पासाहेब जाधव हे भाविक दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान स्नान करीत असताना अचानक खड्ड्यातील खोल पाण्यात बुडाले.
सदर प्रकार लक्षात येताच स्थानिक होडीचालक व भाविकांनी शोधमोहीम राबवत त्यांना पाण्यातुन बाहेर काढण्यात यश मिळविले. तत्पूर्वी ते बेशुद्ध झाले होते. अशा स्थितीत तात्काळ त्यांना उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, ते मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याब्राबत रूग्णालय कर्मचारी लाटणे यांनी शहर पोलिसांना माहिती दिली. (Two devotees died in Chandrabhaga river due to sand thieves) दोन्ही घटनांचा तपास पोलीस नाईक पवार हे करीत आहेत. वाळूचोरांनी पडलेल्या खड्ड्यांमुळे भाविकांना पाण्यात अंदाज येत नाही. पाण्यात उतरल्यावर अचानक पायाखाली खड्डा येतो आणि भाविकाचा बुडून मृत्यु होतो. अशा घटना सतत घडत असतानाही प्रशासन काहीच उपाययोजना करीत नसल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा