जागर न्यूज : कुप्रसिद्ध असलेले पंढरीचे खड्डे पुन्हा प्रसिद्धीस येऊ लागले असून आता या खड्ड्यात युवक कॉंग्रेस चक्क सत्यनारायणाची महापूजा घालणार आहेत. नगरपालिकेच्या बेपर्वाईमुळे युवक कॉंग्रेसने आंदोलन करून तसा स्पष्ट इशाराच दिला आहे.
पंढरपूर शहर आणि परिसर कायम खड्ड्यात हरवलेला असतो. वाहनांना त्रास तर होतोच पण रस्त्यारस्त्यावर प्रचंड धूळ उडत असते. ही धूळ नागरिकांच्या नाका तोंडात जाते आणि आरोग्याला देखील अपाय होतो. पंढरीचे खड्डे जेवढे प्रसिद्ध आहेत तेवढीच इथली धूळ देखील प्रसिद्ध आहे. नागरिकांना कितीही त्रास होत असला तरी नगरपालिकेला मात्र याचे काहीच सोयरसुतक नसते. आता मात्र या खड्ड्यांचा विरोधात देखील आंदोलन करण्यात येवू लागले असून युवक कॉंग्रेसने हा विषय उचलून धरला आहे. दक्षिण काशी म्हणून ओळख असणाऱ्या पंढरपूर शहराजवळ आल्यानंतर भाविकांना एस.टी.मध्ये किंवा गाडीमध्ये,चालत येत असताना खड्ड्यात आदळल्यानंतर त्या भाविकांना पंढरपूर शहरात आल्याची जाणीव होते, ही खेदाची बाब आहे. येत्या आठ दिवसांत शहरातील खड्डे न बुजविल्यास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते त्या खड्ड्यामध्ये सत्यनारायणाची पूजा आयोजित करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी दिला.
गेल्या काही दिवसांपूर्वी सरगम चौकातील येणाऱ्या रस्त्यावर खड्डा असल्याने एका गरीब महिलेचा एस.टी. खाली चेंगरून मृत्यू झाला.तरी देखील प्रशासन झोपलेलेच असल्याचे पाहावयास मिळत आहे. अजूनही प्रशासनाने खड्ड्यांची दुरुस्ती करण्याची मोहीम हाती घेतलेली नाही. आणखी लोकांचा बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येणार आहे. असे प्रदेश युवक कॉंग्रेसचे सचिव श्रीकांत शिंदे यांनी सवाल उपस्थित केला आहे. पंढरपूर नगरपालिकेच्या माध्यमातून वार्षिक बजेट हे १६९ कोटी रुपयांचे सादर केले जाते. त्या बजेटच्या माध्यमातून मात्र सरगम चौकातील असणाऱ्या रेल्वे रुळाच्या खालून जाणारा रस्ता मात्र कायमस्वरुपी दुरुस्त करता येत नाही, ही भाविकांची व पंढरपूरकरांची शोकांतिका म्हणावी लागेल पंढरपूर शहरातील व विशेष म्हणजे सरगम चौकातील सर्व खड्डे कायमस्वरुपी बुजविण्यासाठी महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना, मित्र पक्षाच्यावतीने 'खड्ड्यातून जावा, झंडू बाम लावा' असे आंदोलन करत प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर पंढरपूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर यांना देण्यात आले.
यावेळी काँग्रेसचे जिल्हा सचिव अमर सूर्यवंशी, अॅड. राजेश भादुले, प्रदेश सचिव शंकर सुरवसे,युवक शहराध्यक्ष संदीप शिंदे, ठाकरे युवा सेना शहरप्रमुख श्रीनिवास उपळकर, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष स्वप्निल जगताप,सामाजिक संघटनेचे संतोष बंडगर,गणेश अंकुशराव, धनाजी लटके, सूरज गंगेकर, नीलेश कोरके, सूरज पेंडाल, बलदेव शिकलकर, धीरज टिकोरे, (Pandharpur Pits, Youth Congress Movement and Warning) सारंग महामुनी, शुभम पवार, विशाल सावंत, रशीद शेख, संकेत बारसकर, अक्षय ढाळे, अक्षय शेळके, प्रदीप निर्मळ, दादा थिटे, तानाजी मोरे, यश महिंगडे उपस्थित होते. या आंदोलनानंतर आणि इशारा दिल्यानंतर नगरपालिका किती गांभीर्याने याकडे पाहतेय हेच आता पाहावे लागणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा