जागर न्यूज : सोलापूर येथे अलीकडेच आगीच्या घटना घडल्या असताना पुन्हा एका कारखान्याला आग लागण्याची घटना घडली असून या आगीने कोट्यावधी रुपयांचे नुकसान केले आहे.
गेल्या काही दिवसात सोलापुरात कारखान्यांना आग लागली होती. ही आग भलतीच भडकली होती आणि यात मोठे नुकसान देखील झाले होते. त्यानंतर आणखी एक आगीची घटना घडली आणि आता पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती झाली आहे. सोलापुरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील एका रबर गारमेंट फॅक्टरीला मोठी आग लागली आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही आग लागली असून आगीने रौद्ररुप धारण केलं आहे. दरम्यान, आगीची माहिती मिळताच, घटनास्थळी अग्निशमन दलाचे ५० हून अधिक बंब दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. या आगीमुळे परिसरात धुराचे काळे लोट पसरले आहे.
अजूनही ही आग आटोक्यात आली नसल्याची माहिती आहे. नेमकी आग कशामुळे लागली? याचे कारण अजूनही समोर आलेलं नाही. रबर फॅक्टरीला आग लागल्यानंतर आसपासच्या गारमेंट कारखान्यांनाही आगीने घेरले. मध्यरात्री दीडच्या सुमारास लागलेली आग सकाळी साडेसहापर्यंत धुमसत होती. दरम्यान, आगीची माहिती मिळताच, सोलापूर महापालिका, तसेच एमआयडीसी, एनटीपिसी, अक्कलकोट शहर, बार्शी येथून अग्निशमन दलाचे ४० ते ५० बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाला पाचारण करूनही आग आटोक्यात आली नाही.
या भीषण आगीमुळे परिसरातील इतर कारखानदार हवालदिल झाले. मिळेल ते साहित्य हलवण्यासाठी कारखानदारांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. यावेळी सोलापूर शहर पोलीस फौज फाटा तळ ठोकून आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते. (Once again a huge fire broke out at a rubber factory in Solapur) मात्र, कोट्यावधी रुपयांची मालमत्ता जळून खाक झाल्याची माहिती आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा