जागर न्यूज : सोलापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा बिबट्याची दहशत निर्माण झाली असून मोहोळ, माढा तालुक्यात बिबट्यासदृश्य प्राण्याचे दर्शन झाल्याचे शेतकरी सांगत असून वन विभागाने अधिक सतर्क होण्याची मागणी होऊ लागली आहे.
करमाळा, पंढरपूर, मोहोळ आणि माढा तालुक्यात बिबट्याचा वावर असल्याचा विषय अधूनमधून चर्चेला येताच असतो. करमाळा तालुक्यात चिखलठाण येथे तर बिबट्याने प्रचंड धुमाकूळ घातला होता आणि या बिबट्याला ठार देखील करण्यात आले होते. या घटनेनंतर शेतकरी बिबट्याच्या भीतीतून मुक्त होईल असे वाटत असतानाच पुन्हा जिल्ह्यात कुठे ना कुठे बिबट्या दिसल्याचे आणि हिंस्र प्राण्याने जनावरांची शिकार केल्याचे समोर येत राहिले. कुठे पायाचे ठसे देखील आढळून येत राहिले पण हा बिबट्या आहे की अन्य कुठला हिंस्र प्राणी आहे याबाबत नेमकी माहिती अजूनही मिळू शकली नाही. पंढरपूर तालुक्यातील वाखरी आणि परिसरातील काही गावात या बिबट्या सदृश्य प्राण्याची सतत चाहूल लागत असल्याचे शेतकरी सांगत राहिले होते. आता पुन्हा मोहोळ, माढा तालुक्यात या बिबट्याची भीती पसरली असून बिबट्या सदृश्य प्राणी दिसल्याने हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. मोहोळ तालुक्यातील कोन्हेरी येथील जरग व माने वस्ती परिसरात शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास बिबट्या सदृश्य प्राणी दिसल्याने परिसरात मोठी घबराट पसरली आहे. त्याने वस्तीवरील एका बोकडावर हल्ला केला, मात्र वस्तीवरील नागरिकांनी आरडाओरड केल्याने त्याने पळ काढला.
शुक्रवारी सायंकाळी नेहमी प्रमाणे विठ्ठल सिताराम लवटे हे शेतातुन जनावरे व शेळ्या घेऊन वस्तीवर आले. सायंकाळच्या सुमारास घरातील एका महिला सदस्याने शेळ्या, बोकड घरात कोंडत असताना अचानक बिबट्या सदृश्य प्राणी त्या ठिकाणी आला व त्याने बोकडावर हल्ला केला. बोकडाच्या गळ्याला दात लागला आहे. वस्तीवरील नागरिक जमा झाल्याने सदर प्राण्याने पळ काढला. अनेकांचा तो लाडगा आहे असा गैरसमज झाला. दरम्यान ही माहिती मिळताच शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख चरणराज चवरे, सामाजिक कार्यकर्ते सज्जन चवरे यांनी जरग वस्तीवर येऊन माहिती घेतली व नागरिकांना दिलासा दिला. त्यांनी वनविभागाचे अधिकारी सतीश उडगी, नागनाथ गवळी व त्यांच्या सहकाऱ्यांना फोन करून माहिती दिली.
उडगी व त्यांच्या सहकार्याने घटनास्थळ गाठले व वस्तीजवळच कॅमेरा लावला. तसेच नागरिकांना सूचना दिल्या. शेतकऱ्यांनी गर्दी करू नये, सदरचा प्राणी हा करमाळा, टेंभुर्णी मार्गे पाटकुल परिसरात आला असल्याची शक्यता असून, गर्दी दिसल्यावर तो माणसावर हल्ला करण्याची शक्यता आहे असे वनविभागाने सांगितले आहे. (Leopard terror once again in Solapur district) एकूणच पुन्हा एकदा बिबट्याने सोलापूर जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण केले असून शेतकरी आणि नागरिकांनी सावधगिरी बाळगणे हाच एकमेव उपाय सद्या तरी दिसत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा