जागर न्यूज : सोलापूर जिल्ह्यातील हजारो लोकांनी घरकुलाचा हप्ता घेतला पण घरकुल बांधलेच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून आता या लोकांवर शासकीय रकमेचा गैरवापर केल्याचा गुन्हा दाखल केला जाणार आहे.
घरकुल लाभार्थींनी योजना मंजूर झाल्यापासून जास्तीत जास्त ९० ते १०० दिवसांत घराचे बांधकाम पूर्ण करणे बंधनकारक आहे. पूर्वी हा कालावधी ३६० दिवस होता. दरम्यान, जिल्ह्यातील ६ हजार ९५२ लाभार्थींनी पहिला हप्ता घेऊनही घर बांधलेले नाही. त्यांना लोकअदालीसंदर्भात न्यायालयातून नोटीस बजावण्यात आली. त्याठिकाणी पैसे न भरल्यास संबंधितांवर शासकीय रकमेचा गैरवापर केल्याचा गुन्हा दाखल केला जाणार आहे.जिल्ह्यातील एक लाख २४ हजार लाभार्थींना मागील दहा वर्षांत हक्काचा निवारा मिळालेला नाही. दुसरीकडे जिल्ह्यातील दहा हजारांवर घरांची कामे अर्धवटच आहेत. त्यातील जवळपास सात हजार लाभार्थींनी दोन वर्षांपूर्वी घरकूल बांधणीचा पहिला हप्ता घेतला. यावेळी जवळपास नऊ कोटी रुपये लाभार्थींना वितरित केले.
वास्तविक पाहता २६८ चौरस फुटावरच घरकूल बांधावे, अशी शासनाची अट आहे. मात्र, घर पुन्हा पुन्हा होत नाही म्हणत लाभार्थींनी अर्ध्या गुंठ्यावर घराचे बांधकाम काढले. त्यामुळे घरकुलांचा खर्च वाढतो आणि शासनाच्या एक लाख २० हजारांच्या अनुदानात घराचे काम पूर्ण करणे अशक्य होते. आता तशा लाभार्थींकडे नऊ कोटी रुपये अडकले असून त्यांना ग्रामीण विकास यंत्रणेने न्यायालयाच्या माध्यमातून नोटीस बजावली आहे. त्याला प्रतिसाद न दिल्यास त्यांच्यावर ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार पोलिसांत गुन्हा दाखल होणार आहे.महसूल विभागाच्या मदतीने १९६० ते १९८८ या काळात जिल्ह्यातील बहुतेक गावांमध्ये बेघरांसाठी गावठाण तयार करण्यात आली. अनेकांना हक्काची जागा मिळाली, पण अजूनही जिल्ह्यातील ५० हजारांवर लोकांना राहायला हक्काची जागा नाही.
शासनाकडून घरकुल योजनेसाठी तशा लाभार्थींना जागा घ्यायला ५० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. सध्याच्या काळात तेवढ्या पैशात जागा घेणे कठीणच आहे. (Gharkul scheme, misuse of government money) दुसरीकडे मात्र गावठाणाच्या जागेवर अनेक धनाढ्यांनी अतिक्रमण केल्याची वस्तुस्थिती आहे. काहींनी पूर्वीच्या घरकुलांची जागा बॉण्ड पेपरवर दुसऱ्याच व्यक्तीला विकली आहे. तरीपण, जिल्हा प्रशासनाकडून त्यावर काहीच कार्यवाही होत नाही. असा सगळा सावळा गोंधळ चव्हाट्यावर येऊ लागला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा