जागर न्यूज : बाहेर कुणी कायद्याचा भंग केला तर न्यायालयात न्याय मिळविण्यासाठी दाद मागितली जाते, पंढरपूर न्यायालयाच्या आवारात मात्र पक्षकारांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
बाहरे दादागिरी करणारे भलेभले गुंड देखील न्यायालयाचे नाव काढताच चिडीचूप होतात. न्यायालय आणि न्यायालयाच्या आवारात शांतता पाळली जाते. अनेक गुंड, गुन्हेगार अशी मंडळी या परिसरात असतात पण 'आवाज' करीत नाहीत. पक्षकारांनी मात्र पंढरपूर न्यायालयात भलताच राडा घातला आणि त्या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे.शेतजमिनीच्या वादातून येथील जिल्हा न्यायालयाच्या आवारातच पक्षकारांमध्ये तुंबळ हाणामारी होऊन तीनजण जखमी झाल्याची घटना काल घडली. (Fight between parties in Pandharpur court premises)न्यायालयाच्या आवारात पक्ष आणि प्रतिपक्ष हे दोन्ही घटक येत असतात. परस्परात वैमनस्य असले तरी न्यायालयाच्या आवारात काही अनुचित करण्याचे धाडस कुणीच करीत नाही. वादी आणि प्रतिवादी हे परस्परांपासून दूर थांबलेले असतात. न्यायालयाने पुकारल्यावरच हे दोन्ही पक्ष न्यायालय कक्षात प्रवेश करीत असतात. अशा वातावरणात दोन गटात जोरदार राडा झाला आणि एवढी मारामारी झाली की दोन्हीकडील लोक रक्तबंबाळ झाले.
पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथील सचिन नामदेव चव्हाण व त्यांचा मुलगा सुयश सचिन चव्हाण हे दाखल असलेल्या खटल्याची तारीख असल्याने येथील जिल्हा न्यायालयात आले होते. आवारात गाडी लावून ते न्यायालयात जात असतानाच शेतजमिनीच्या वादावरून बाबू निवृत्ती जाधव याने तेथे येऊन अचानक सचिन चव्हाण यांच्या डोकीत दगड मारला. तसेच उजव्या हाताच्या अंगठ्या जवळील बोटाचा जोरात चावा घेऊन जखमी केले. यादरम्यान, मुलगा सुयश चव्हाण यालाही रमेश बाबू जाधव याने लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. जाधव पिता-पुत्रांनी चव्हाण पिता-पुत्राला शिवीगाळी करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली, अशा आशयाची फिर्याद शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, या भांडणात यातील बाबू निवृत्ती जाधव हा ही जखमी झाला आहे. त्याला उपचाराकरिता रूग्णालयात पाठविण्यात आले. सकाळी सर्व न्यायालयांचे कामकाज सुरू होत असतानाच आवारात जोरदार हाणामारीमुळे एकच गोंधळ उडाला. त्यातच दोन्हीकडील जखमी रक्तबंबाळ झाल्याने गर्दी झाली. पोलीस व इतर पक्षकारांनी मध्यस्थी करीत सोडवासोडवी केली परंतु पोलिसात या घटनेचा गुन्हा मात्र दाखल झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा