जागर न्यूज : सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील तीन आधार सेवा केंद्रांची मान्यता रद्द करून यांना सील ठोकण्यात आले आहे. ग्राहकाकडून जादा रक्कम वसूल केल्याच्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून या कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे.
जनतेच्या सोयीसाठी शासनाकडून आधार सेवा केंद्राला मान्यता दिली जाते आणि येथून सेवा देण्यासाठी जनतेकडून किती रक्कम घेतली जावी हे ठरवून दिले जाते. अशा ठिकाणावरून मात्र काही जण आपल्याला वाटेल तशी रक्कम जनतेकडून वसूल करतात याचा अनुभव नेहमीच येत असतो. कामासाठी अवाजवी रक्कम मागितली जाते आणि ती वसूल देखील केली जाते. अशा प्रकाराला चांगलाच हिसका बसला असून सोलापूर जिल्ह्यातील तीन आधार सेवा केंद्राची मान्यताच रद्द करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यात १५७ मान्यताप्राप्त आधार केंद्रे आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या रक्कमेपेक्षाही अधिक पैसे घेतल्याप्रकरणी शहर- जिल्ह्यातील ३ आधार सेवा केंद्रे सील करून त्यांची मान्यता रद्द करण्यात आली. (Approval cancelled of three Aadhaar Seva Kendras in Solapur district )तसेच प्रत्येकी ५० हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील दोन व नातेपुते (ता. माळशिरस) येथील एका केंद्राचा समावेश आहे.
लहान बालकांचे आधार कार्ड काढण्यासाठी शुन्य रुपये, ५ वर्षापुढील बालकांचे आधारकार्ड अपडेटसाठी शुन्य रुपये, त्यापुढील वयोगटातील आधारकार्डावरील दुरुस्तीसाठी ५० रुपये आणि चूका तपासण्यासाठी १०० रुपयांपर्यंतचे चार्जेस घेण्याच्या सूचना भारतीय विशिष्ट ओळखपत्र प्राधिकरणाने दिलेल्या आहेत. तरीदेखील अधिकचे पैसे घेतल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्यांची अचानक भेटी देऊन तपासणी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील सेतूतील एक, दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयाजवळील एक आणि नातेपुते येथील एक असे एकूण तीन केंद्रावर धाडी टाकण्यात आल्या.विशेष म्हणजे, माळशिरस तालुक्यातील मोरोची जिल्हा परिषद शाळेत केंद्र चालविण्याची परवानगी असताना ते नातेपुते येथे चालविले जात असल्याचे उघडकीस आले. या केंद्रांकडील ऑपरेटर्सना एक वर्षासाठी काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. अधिकच्या पैशांची मागणी होत असेल तर १९४७ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहनही त्यांनी केले. या कारवाईने अधिक रक्कम घेणाऱ्या सेवा केंद्राचे धाबे दणाणले असून इतरावर देखील याचा परिणाम होणार आहे आणि जनतेची अनावश्यक लुट थांबण्यास देखील यामुळे मदत होणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा