जागर न्यूज : राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची तळागाळापर्यंत जोडलेली नाळ पुन्हा एकदा समोर आली असून केवळ कार्यकर्त्यांच्या प्रेमासाठी पवार हे सपत्नीक एका विवाहासाठी मंगळवेढ्याच्या लग्न मंडपात हजर झाले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख असलेले शरद पवार यांची या वयातही ग्रामीण भागापर्यंत असलेली नाळ तुटलेली नाही. पवार हे गावागावातील जुन्या कार्यकर्त्यांना नावासह ओळखतात हे त्यांचे वैशिष्ट्य असून देशाच्या राजकारणात असा एकमेव नेता आहे. कुठल्याही गावात गेले तरी चार दोन लोकांना ते नावासह हाक मारतात आणि जुन्या सवंगड्याची नावे घेत त्यांची चौकशी देखील करतात. त्यांचे हे वैशिष्ट्य उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. वयाची ८० वर्षे उलटून गेली तरी ते कधी थकत नाहीत की आपल्या मोठेपणाचे भांडवल करीत नाहीत. कोरोनाच्या काळात सगळी दुनिया घरात बसून होती पण शरद पवार यांचे महाराष्ट्रभर फिरणे सुरु होते. आत्ताही त्यांनी कार्यकर्त्याचे प्रेम म्हणून मंगळवेढा येथील एका विवाह सोहळ्यात सपत्नीक हजेरी लावली आणि तोच उत्साह, तेच प्रेम त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.
मंगळवेढा तालुक्यातील एका जुन्या कार्यकर्त्याच्या प्रेमासाठी त्याच्या घरातील विवाह कार्यास शरद पवार आवर्जून उपस्थित राहिले. आठवडा बाजारात रस्त्यावर अंड्याची खरेदी विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी वडीलाला मदत करत पवारांच्या विचारावर प्रेरित होऊन (Sharad Pawar present at marriage hall for activist's love) राजकारणात प्रवेश केलेल्या लतीफ तांबोळी या कार्यकर्त्याच्या मुलीच्या लग्नासाठी चक्क राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सपत्नीक विवाह सोहळ्याला हजेरी लावत कार्यकर्त्याप्रती असलेले संबंध या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने वृद्धिंगत केले.
तालुक्यातील मरवडे येथील लतीफ तांबोळी यांचा वडिलार्जित दर आठवडा बाजारात रस्त्यावर बसून अंड्याची खरेदी- विक्री करण्यासाठी वडिलांच्या बरोबर मदतीसाठी व्यवसायात सहभाग आठवीपासून नोंदवला बारावीपर्यंत हा व्यवसाय करत असताना बारावीत नापास झाल्यानंतर थेट राजकारणात तत्कालीन काँग्रेस आ.लक्ष्मण ढोबळे यांच्याबरोबर राजकारणात प्रवेश केला. राजकारणात पाऊल ठेवल्यानंतर कमी शिक्षणावर देखील चांगल्या पद्धतीचे वक्तृत्व अंगीकारल्यामुळे मरवडे ग्रामपंचायत सरपंच पदापासून ते पत्नीला पंचायत समिती पर्यंत संधी मिळवली.काही ठिकाणी अपयश आले.परंतु काँग्रेसचा तालुकाध्यक्ष काम करत असताना १९९९ ला राष्ट्रवादीची स्थापनेनंतर राष्ट्रवादीचे काम करत असताना राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्ष, मतदारसंघ अध्यक्ष जिल्ह्यावर जनरल सेक्रेटरी,ओबीसीचा जिल्हाध्यक्ष, पाच जिल्ह्याचा ओबीसीचा प्रमुख त्यांचा राजकीय प्रवास झाला.
सदर राजकीय प्रवासात त्यांनी खा. शरद पवारांना दैवत म्हणून काम केल्यामुळे त्यांच्या मुलीच्या लग्नाची तारीख निश्चित करून पत्रिका देण्यासाठी पवाराकडे गेल्यानंतर त्या तारखेला खा.पवारांचा दौरा निश्चित नसल्यामुळे केवळ पवारांसाठी त्यांनी मुलीच्या लग्नाची तारीख तिथी आणि दिवस देखील बदलला शक्यतो मुस्लीम समाजामध्ये शनिवार हा दिवस अशुभ मानला जातो. तरी देखील त्यांनी आपल्या नेत्याच्या उपस्थितीसाठी शुभाशुभ विचारला बगल दिली आणि शरद पवार यांनीही सर्व रूढी परंपराला छेद देत याच दिवशी संपत्निक लग्नाला हजर राहून कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीच्या इतर पदाधिकाऱ्यांना एक सुखद धक्का त्यांनी दिला. यावेळी विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील,दीपक साळुंखे,भगीरथ भालके,उमेश पाटील, राहुल शहा, चंद्रशेखर कौडूभैरी, तालुकाध्यक्ष पी.बी. पाटील, फिरोज मुलाणी आदी उपस्थित होते. शरद पवार यांचे कार्यकर्त्यावरील प्रेम पाहून सामान्य जनताही भारावून गेली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा