जागर न्यूज : 'ते' उमेदवार ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मत मागायला आले तर अपमान करण्यात येईल असा फलकच एका मतदाराने आपल्या घराच्या दारात लावला असून या फलकाची आणि उमेदवारांचीही मोठी चर्चा सुरु झाली आहे.
सद्या राज्यात अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुरु असून गावागावातील निवडणुका वेगवेगळ्या कारणांनी गाजत आहेत. कुठलीही निवडणूक म्हटलं की उमेदवार आणि त्याच्या विषयीची विविध चर्चा सुरु होते. काही काही गावात तर अशा निवडणुकीत वेगळेपण दिसून येते आणि त्याची चर्चाही होत राहते. बारामती तालुक्यात नेहमीच चर्चेत राहिलेले वाघळवाडी हे गाव पुन्हा एकदा असेच चर्चेत आले आहे. ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आणि माहिती अधिकार कार्यकर्ते सुरेश किसनराव यादव यांनी या निवडणुकीत आपल्या घरावर एक बॅनर लावला असून, तो बॅनर तालुक्याचे लक्ष वेधून घेत आहे. निवडणुकीतील उमेदवार हा स्वच्छ चारित्र्याचा असावा अशी अपेक्षा असते परंतु अनेक उमेदवार हे कुठल्या न कुठल्या आरोपात गुरफटलेले असतात आणि विशेष म्हणजे तरी देखील ते निवडून येतात. राजकारणात गुन्हेगारी प्रवृत्तीने मोठी घुसखोरी केली असून अशी मंडळीही निवडणुकीत विजयी होताना दिसतात.
गुन्हेगारी प्रवृत्तीची तसेच भ्रष्ट असणारी व्यक्ती निवडून येऊ नये अशी अनेकांची इच्छा असते. समाजातील चांगल्या प्रवृत्तीचे मतदार अशा उमेदवाराला मतदान करीत नाहीत. तरीही ही मंडळी पैशावर स्वार होत विजयाचा जल्लोष करतात. गुप्त मतदान असल्यामुळे मतदार मतदान करून आपले कर्तव्य बजावतात. समाजकंटक उमेदवाराला मतदान करीतही नाहीत पण काही जागरूक मतदार रोखठोकपणे आपला आवाज उठवतात. वाघाळवाडी येथील एक जागरूक मतदार, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आणि माहिती अधिकार कार्यकर्ते सुरेश यादव यांनी मात्र तशा उमेदवारांना निवडणुकीच्या आधीच त्यांची जागा दाखवली आहे आणि इतर मतदारांना देखील एक दमदार संदेश पोहोचवला आहे.
सुरेश यादव यांनी "समाजकंटक, भ्रष्टाचारी व भ्रष्टाचाराला अभय देणारा उमेदवार मत मागायला आल्यास अपमान केला जाईल, अशा आशयाचे बॅनर लावले आहे.यादव यांच्या घरात पाच मते आहेत. राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. वाघळवाडी गाव राजकीयदृष्ट्या नेहमी चर्चेत असते. बॅनरमुळे यावर पुन्हा शिक्कामोर्तब झाले आहे. त्याची राज्यभर चर्चा होऊ लागली आहे. (Board of Electors in Gram Panchayat Elections) गेल्या वर्षी पार पडलेल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत संचालकपदाला डावलण्यात आल्याने निरा- बारामती या राज्य मार्गावर केळीचे चित्र असलेले बॅनर लावण्यात आले होते. याची चर्चा जिल्हाभर झाली होती. आता ग्रामपंचायत निवडणुकीत सुरेश यादव यांनी लावलेल्या फलकाची तालुकाभर चर्चा सुरु आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा