जागर न्यूज : दुचाकीची चोरी करणाऱ्या पाच जणांच्या मुसक्या आवळून तब्बल २६ दुचाकी जप्त करण्यात सांगोला पोलिसांना यश आले असून त्यांच्याकडून आणखीही काही चोरीच्या दुचाकी मिळण्याची शक्यता आहे.
अलीकडे दुचाकी चोरी होण्याच्या घटनात मोठी वाढ झाली असून पोलीस सतत दुचाकी चोरांना गजाआड करीत आहेत तरीही या चोऱ्या कमी होताना दिसत नाहीत. दुकानासमोर अथवा बँकेसमोर दुचाकी उभी करून नागरिक आपल्या कामासाठी थोडा वेळ जरी गेले तरी तेवढ्यात दुचाकी गायब होत असते. अनेकदा घरासमोर लावलेल्या गाड्या देखील चोरीला जात आहेत. अशा चोऱ्यामुळे दुचाकी वापरणेही अडचणीचे ठरू लागले आहे. पोलीस सतत या दुचाकीचोरांचा शोध घेत असतात आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दुचाकी जप्त करून त्या संबंधिताना परत करीत असतात. या चोरांना गजाआड केले जाते परंतु पुन्हा दुचाकी चोरी होतच राहते. सांगोला पोलिसांनी आता पुन्हा तब्बल २६ दुचाकी हस्तगत केल्या आहेत तर पाच दुचाकी चोरांना अटक करण्यात आली आहे. एकूण ११ लाख १५ हजाराचा मुद्देमाल सांगोला पोलिसांनी हस्तगत केला आहे.
सांगोला पोलीस स्टेशनच्या हददीत घडलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्हयांचा तपास करीत असताना पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीवरून संशयीत आरोपी महंमदहुसेन साहेब शेख (रा. रेवणेगल्ली, तांदुळमार्केट, मिरज, ता. मिरज, जि. सांगली), संतोष सिदधु शिंगे (रा. मिरज, ता. मिरज, जि. सांगली) यांस मिरज येथुन ताब्यात घेवून त्यांना सदर गुन्हयात अटक केली. अधिक तपास केला असता सदर आरोपीने मिरज, कागवाड व इतर जिल्हयातुन वेगवेगळ्या ठिकाणाहुन १५ दुचाकी चोरल्याचे कबुली देवुन त्या मंगळवेढा तालुक्यातील खुपसंगी येथे विक्री केल्याचे सांगीतले. त्याच्याकडून पोलिसांनी या १५ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. हा जप्त करण्यात आलेला मुददेमाल हा अंदाजे ८ लाख ३५ हजार रुपये किंमतीचा आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले गुन्हे शोध पथकाने संशयीत आरोपी सोपान वैजिनाथ वगरे (रा. गुंफावाडी, ता. लातुर, जि. लातुर), पप्पु उर्फ ज्ञानेश्वर रावसाहेब बुरंगे (रा. जवळा, ता. सांगोला), अमोल बिरा वगरे (रा. बुरंगेवाडी, ता. सांगोला) यांना सदर गुन्हयात अटक करून सोलापुर व इतर जिल्हयातुन वेगवेगळ्या ठिकाणाहुन ११ दुचाकी चोरल्याचे कबुली देवुन त्या सांगोला तालुक्यातील जवळा, बुरंगेवाडी, तरंगेवाडी येथे विक्री केल्याचे सांगीतले. दोन लाख ८० हजार रुपयच्या ११ मोटार सायकल हस्तगत करण्यात आलेल्या आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या पाच आरोपीकडून एकुण २६ मोटरसायकली जप्त करून ११ लाख १५ हजार रुपये किंमतीचा चोरीस गेलेला मुददेमाल जप्त करण्यात पोलीसांना यश आले आहे. या गुन्हयाचा तपास पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे. अप्पर पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, पोलिस निरिक्षक अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. नागेश यमगर, स.पो.नि. प्रशांत हुले, पो.हे.कॉ. दत्ता वजाळे, पो.ना. अभिजीत मोहोळकर, पो.ना. बाबासाहेब पाटील, पो.ना. मेटकरी, पो.ना. नलवडे, पो.कॉ. सांवजी, पो.कॉ. संभाजी काशीद, युसुफ पठाण यांनी गुन्हा उघडकीस आणला आहे. (Five bike thieves arrested, stolen bikes seized) पोलिसांनी केलेल्या तपासामुळे २६ जणांना त्यांच्या चोरीला गेलेल्या दुचाकी आता परत मिळणार आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा