जागर न्यूज : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आपण मुख्यमंत्री असल्याचा विसर पडला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे लाडके मुख्यमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख केल्याचे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राज्याचा कारभार उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच पहात आहेत अशी टीका सातत्याने विरोधकाकडून होत असते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोरचा माईक फडणवीस यांनी ओढून घेतला होता तेंव्हापासून ही टीका अधिक वाढली असून विरोधक एकनाथ शिंदे यांचा डमी मुख्यमंत्री असा वारंवार उल्लेख करीत असतात. मुख्यमंत्री शिंदे हे केवळ नावालाच मुख्यमंत्री आहेत, सगळ्या किल्ल्या उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहेत असे ठाकरे गटाकडून नेहमी सांगण्यात येते. आता मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच फडणवीस हे राज्याचे लाडके मुख्यमंत्री असल्याचे सांगितले आहे. मुख्यमंत्री शिंदे हे आपण राज्याचे मुख्यमंत्री आहोत हेच विसरून गेले असल्याचे दर्शवणारे वक्तव्य त्यांच्याकडून झाले आहे त्यामुळे चर्चा तर होऊ लागली आहेच पण अनेकांच्या भुवया देखील उंचावल्या आहेत.
एका भाषणात सुरुवातीला उल्लेख करताना एकनाथ शिंदे यांनी ‘ राज्याचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी.. ' असा उल्लेख केला. शिंदे यांच्या या वक्तव्याने विविध चर्चांना उधाण आलंय.गोरेगाव येथील कोकण महोत्सवादरम्यान एकनाथ शिंदे यांनी हे वक्तव्य केलं. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेराज्याचा कारभार मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे पाहत नसून ते उपमुख्यमंत्री आहेत अन् देवेंद्र फडणीवस हे मुख्यमंत्री आहेत, असे टोमणे वारंवार विरोधकांकडून लगावले जातात. राज्यात महाविकास आघाडी सरकार पायउतार झाल्यानंतरही देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री बनणार अशी चर्चा असतानाच मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांना बसवण्यात आलं.
भाजप श्रेष्ठींच्या या निर्णयानं राजकीय तज्ज्ञ, विश्लेषकही चक्रावून गेले होते. स्वतः देवेंद्र फडणवीसदेखील नाराज दिसून येत होते. मात्र शिंदे-भाजप युती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाले आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची वर्णी लागली. शिंदेंच्या आमदारांच्या गटाने भाजपशी युती केली असल्याने राज्यातील सर्व निर्णय भाजपच्याच मतानुसार होतात, एकनाथ शिंदे फक्त नावाला मुख्यमंत्री आहेत, अशी टीका ठाकरे गटाच्या नेत्यांकडून वारंवार केली जाते.
आता तर खुद्द एकनाथ शिंदे यांनीच हे वक्तव्य केल्याने आता विरोधकांच्या हातात आयतं कोलित सापडलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याचा हा व्हिडिओ राजकीय वर्तुळात वेगाने व्हायरल होतोय.(Devendra Fadnavis is the Chief Minister of the state again) सोशल मीडियावर नेटकरी एकनाथ शिंदे यांचा खरपूस समाचार घेतायत. आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यावर काय स्पष्टीकरण देतायत, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा