जागर न्यूज : पंढरपूर तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याची दहशत निर्माण झाली असून शेतकरी भीतीच्या दडपणाखाली वावरत आहेत. हिंस्र पाणी जनावरांचा फडशा पाडत असताना, वन विभागाकडून मात्र आता फारशा अपेक्षाही दिसून येत नाहीत.
पंढरपूर तालुक्यात बिबट्याची दहशत आधीपासूनच आहे , विशेषत: वाखरी परिसरात याची चर्चा नेहमी होत आलेली आहे. आता भाळवणी गावच्या पश्चिम भागात गेल्या महिन्यापासून बिबट्या सदृष्य प्राण्याने दहशत माजवली आहे. भाळवणी, तांदुळवाडी, शेंडगेवाडी परिसरात या प्राण्यांचा वावर वाढला असून रातोरात शेतकऱ्यांची जनावरे फस्त केली जात असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जनावरांवर हल्ले करणारे बिबट्या असल्याचे दावे शेतकऱ्यांमधून केले जात असून त्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. भाळवणी परिसरात उसाचे क्षेत्र मोठे आहे. तसेच तरकारी पिके व गायींचे गोठे आहेत. या भागात बिबट्यासदृष्य प्राण्याचे वारंवार दर्शन होत असल्याने शेतीच्या कामावर मोठा परिणाम झाला आहे. या प्राण्याने शेळ्या मेंढ्या, कोंबड्या, कुत्रे तसेच गायी, वासरे यांच्यावर हल्ले करून फस्त केल्याच्या घटना घडल्या आहेत.
शेतीतील लाईट रात्री असल्याने शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहे. शाळेतील मुलेही शाळा सुटल्यानंतर घरी जाताना बिबट्याच्या दहशतीमुळे जीव मुठीत धरून पायी प्रवास करीत आहेत.या परिसरात दहशत माजविणाऱ्या बिबट्या अथवा बिबट्यासदृष्य अन्य प्राण्याचा वनविभागाने तात्काळ बंदोबस्त करून त्यास त्यांच्या अधिवासात सोडण्यात यावे. ज्या शेतकऱ्यांची जनावरे दगावली आहेत, त्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी, शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज मिळावी, अशा मागण्या ग्रामस्थांमधून होत आहेत. परिसरात बिबट्या अथवा बिबट्यासदृष्य प्राणी दिसून आल्यास तात्काळ ग्रामसुरक्षा यंत्रणेमार्फत परिसरातील नागरिकांना सतर्क केले जात आहे. त्यामुळे नागरीक जागरूक होऊन पुढील होणारी घटना टळली जात आहे. त्यामुळे ग्रामसुरक्षा यंत्रणेचे ग्रामस्थांमधून कौतुक केले जात आहे.
बिबट्याचा या परिसरात वावर असल्याबाबत वनविभागानेही दुजोरा दिला आहे. तसेच कांही ठिकाणी कॅमेरे बसविले असल्याचे सांगण्यात येत आहे. शेती व पिकांमध्ये तसेच गावातील भटके कुत्रे हे भक्ष्य असल्याने मानवी वस्तीलगत बिबट्यांचा वावर असल्याचेही सांगितले जात आहे. (Leopard terror in Pandharpur taluka) त्याचा पाठलाग न करता हातात काठी घेऊन जमिनीवर आवाज करावा, हातात थाळी घेऊन वाजवावी, असे आवाहन ग्रामस्थांना केले जात आहे. मात्र, संबंधित प्राण्यास जेरबंद करण्याबाबत वनविभागही हतबल असल्याचे चित्र दिसत आहे. शेतकरी मात्र आपल्या शेताकडे जाण्यास घाबरत आहे परंतु शेतीच्या कामासाठी त्याला जीव धोक्यात घालून जावे लागत आहे. वन विभागाने यावर नेमकी माहिती देणेही तितकेच आवश्यक बनले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा