जागर न्यूज : निवडणुकातील वाढत्या चुरशीमुळे निवडणूक कर्मचारी तणावात येत असतानाच निवडणुकीच्या कामावर निघालेल्या शिक्षकाचा अपघाती मृत्यू झाल्याने निवडणूक कर्मचारी आणि शिक्षक वर्गात कमालीचे दु:ख व्यक्त करण्यात येत आहे.
निवडणूक म्हटले की हे राष्ट्रीय काम म्हणून शासकीय सेवकांना करावे लागते. हे राष्ट्रीय कार्य मानले जात असले तरी बहुतेक कर्मचारी हे काम करण्यास उत्सुक नसतात. दोन दिवस होणारी गैरसोय आणि निवडणुकीतील तणाव, चुरस याला कर्मचारी घाबरलेले असतात. अशा कामाच्या वेळी कर्मचाऱ्याला हृदयविकाराचे झटके आलेले आहेत आणि मृत्युमुखी पडल्याच्याही घटना घडलेल्या आहेत. वेल्हे तालुक्यात मात्र निवडणुकीच्या कामावर निघालेल्या शिक्षकाचा अपघात झाला आणि यात त्यांचा मृत्यूही झाला आहे. राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा आजचा मतदानाचा दिवस आहे परंतु तत्पूर्वीच ही दुर्घटना घडली पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात मतदान साहित्य वाटप केंद्रावर दुचाकीवरून जात असताना ट्रकची धडक बसून शिक्षकाचा दुर्देवी मृत्यू झाला.
वेल्हे तालुक्यातील धानेप गावच्या हद्दीत घडली आहे. सागर नामदेव देशमुख (वय ३३, मूळ गाव - वारंगुसी, ता. अकोले, जि. नगर) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. ते वेल्हे तालुक्यातील कंधारवाडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये उपशिक्षक म्हणुन कार्यरत होते. वेल्हे तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी देशमुख यांची मतदान अधिकारी क्र. 3 म्हणुन नियुक्ती करण्यात आली होती, अशी माहिती वेल्ह्याचे तहसीलदार शिवाजी शिंदे यांनी दिली. शिक्षक सागर देशमुख हे पानशेत कडून कादवे मार्गे दुचाकी क्रमांक एमएच 14-सीबी 7314 ने वेल्हे याठिकाणी मतदान साहित्य वाटप केंद्रावर येत होते. यावेळी धानेप गावच्या हद्दीत हा अपघात घडला. एमएच-12 एमव्ही 5190 या क्रमांकाच्या ट्रकची व दुचाकीची धडक झाली. दरम्यान, त्यांना उपचारासाठी वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
अतिशय प्रामाणिक, कार्यतत्पर अशा शिक्षकाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पूर्ण शिक्षण विभागात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Accidental death of a teacher who left for election work) देशमुख यांचा तीन वर्ष शिक्षण सेवकाचा कार्यकाल संपल्याने सेवा नियमित करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे मंजुरीसाठी होता. या घटनेबाबत वेल्हे पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा