जागर न्यूज : सोलापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यातील महिलांना गंडा घालणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून दुधवाल्याचा पाहुणा म्हणून हे भामटे वृद्ध महिलांना लुटत होते.
दुधवाल्याची माहिती काढून जेथे हा दुध घालतो त्या घरात थेट घुसून अत्यंत कौशल्याने घरातील महिलांच्या दागिन्याची लुट करीत होते. तुमच्या दूधवाल्याचा पाहुणा आहे किंवा त्याची ओळख सांगून शहरातील बंगल्यातील व सोसायटीतील वयोवृद्ध महिलांच्या गळ्यातील दागिने लुटणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा शहर गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. तिघांना पोलिसांनी जेरबंद करून त्यांच्याकडून साडेसहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अशोक ऊर्फ डॉन नामदेव गंगावणे व अशोक ऊर्फ कंट्या विश्वनाथ गंगावणे व अनिल रघुनाथ बिरदवडे (तिघेही रा. बांदलवाडी, ता. बारामती) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
सोलापूर जिल्ह्यासह सातारा, पुणे जिल्ह्यात या भामट्यांनी धुमाकूळ घातला होता. दुसरीपर्यंत शिक्षण झालेल्या त्या तरुण चोरट्यांच्या नावे पुणे शहर, पुणे ग्रामीण, भोर, शिरूर, सातारा (शिरवळ) येथील पोलिसांत अशाच प्रकारच्या एकूण १४ गुन्ह्यांची नोंद आहे. त्यांनी बार्शी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन महिलांच्या गळ्यातील दागिने देखील चोरले होते. गुन्ह्यांची पद्धत अजब असल्याने पोलिसांचीही डोकेदुखी वाढली होती. पोलिसांनी शहरातील सीसीटीव्ही फुटेज मिळवून दुचाकीवरून जाणाऱ्या चोरट्यांचा तपास सुरूच ठेवला. जवळपास १०० ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून शहर पोलिसांनी अखेर त्या चोरट्यांना शोधून काढून त्यांना तुरुंगाची हवा खायला पाठवले आहे.
महिलेच्या गळ्यातील दागिने चोरल्यानंतर काही अंतरावर गेल्यानंतर दुचाकी चालवणारा मागे बसायचा आणि मागे बसलेला दुचाकी चालवायचा. पोलिसांना अंदाज येऊ नये म्हणून त्यांनी अनोखी शक्कल अवलंबली. रात्रीच्या सुमारास बारामतीवरून शहराजवळ यायचे आणि दूधवाल्याच्या वेळेत ते महिलांना फसवत होते.
गवळ्याच्या व्यवसायाशी संबंधित त्या तिघांनी सुरवातीला पुणे शहरातील महिलांना टार्गेट केले. त्या ठिकाणी पोलिसांच्या रेकॉर्डवर आल्यानंतर त्यांनी पुणे शहर सोडले आणि पुणे ग्रामीणमध्ये दूधवाल्याचा बहाणा करून महिलांच्या गळ्यातील दागिने चोरले. तेथील पोलिसांनी त्यांना पकडले होते आणि तेथून सुटल्यावर त्यांनी साताऱ्यात तसाच प्रकार सुरू केला. सातारा पोलिसांच्या रेकॉर्डवर आल्यानंतर त्या तिघांनी सोलापूर शहराला टार्गेट केले.
शहरातील बंगले व सोसायट्यांतील महिलांबद्दल जाणून घेतले. दूधवाला आल्यावर दूध घ्यायला कोणती महिला येते, तिच्या गळ्यात दागिने असतात का, याची माहिती त्यांनी मिळवली. (Interstate gang of cheating women arrested)त्यानंतर दूधवाल्याचे नाव जाणून घेऊन त्या तिघांनी विजापूर नाका, जोडभावी पेठ व फौजदार चावडी पोलिस ठाणे हद्दीतील तीन महिलांना तुमच्या दूधवाल्याचा पाहुणा असल्याचे सांगून चार लाख ८० हजार रुपयांचे दागिने चोरले होते, अशी माहिती पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली काळे यांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा