जागर न्यूज : जिल्हा परिषदेच्य प्राथमिक शिक्षणाचे 'कल्याण' नेहमी अनुभवाला येत असतानाच सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षकांची तबब्ल ४०० पदे रिक्त आहेत.
जिल्हा परिषदेच्या शाळा आणि तेथील शिक्षण याबाबत सगळेच बोलत असतात. या शाळांची काय अवस्था आहे हे गावागावात लोक पहात असतात. सरकारी शाळा ओस पडतात आणि खाजगी शाळात प्रचंड गर्दी होत असते हे चित्र देशभर आणि पुर्वांपार आहे पण ही परिस्थिती बदलताना कधी दिसत नाही. ज्यांच्याकडे खाजगी शाळांच्या भरमसाठी खर्चासाठी पैसे नाहीत असे गरीब विद्यार्थी नाईलाजाने या शाळामधून शिकत असतात. शासन वेगवेगळे उपक्रम राबवते परंतु त्याचा खरोखरच गुणवत्ता वाढीवर काय परिणाम होतोय काय ? याची बारकाईने तपासणी करते काय ? हा प्रश्न देखील अनेकाना पडलेला असतो.
दहा टक्क्यांपेक्षा कमी पदे रिक्त असलेल्या जिल्हा परिषदांमधील शिक्षकांची तात्काळ आंतरजिल्हा बदली झाली. त्यानुसार सोलापूर जिल्हा परिषद शाळांमधील ६६ शिक्षक त्यांच्या स्वत:च्या जिल्ह्यात परतले. दुसरीकडे मात्र आपल्या जिल्ह्यात जवळपास १०० शिक्षक येणे अपेक्षित असतानाही केवळ २९ जणच आले आहेत. विशेष म्हणजे शिक्षकांची चारशे पदे रिक्त असतानाही आपल्याकडील शिक्षकांना तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी कार्यमुक्त केले आहे. सोलापूर जिल्ह्य परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांचे लाच प्रकरण राज्यात नुकतेच गाजले आणि अजूनही गाजत आहे, त्यातच शिक्षणाचा खेळखंडोबा कसा सुरु आहे हे देखील समोर येवू लागले आहे.
ग्रामविकास विभागाने यंदा प्रथमच शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्ह्याअंतर्गत बदल्या ऑनलाइन पध्दतीने केल्या. सुरवातीला आंतरजिल्हा बदल्या झाल्या. दिवाळीपूर्वी ही प्रक्रिया पार पडली. मानवी हस्तक्षेप नको या हेतूने यंदा ऑनलाइन बदली प्रक्रिया राबविण्यात आली. आता जिल्ह्याअंतर्गत शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरु असून डिसेंबरपर्यंत एकाच ठिकाणी पाच वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांची दुसऱ्या शाळेवर बदली होणार आहे. वास्तविक पाहता १५ जूनपूर्वी म्हणजे शाळा सुरु होण्यापूर्वीचशिक्षकांची बदली प्रक्रिया पार पडते. मात्र, यंदा बदल्यांसाठी ऑगस्ट ते डिसेंबर असा पाच महिन्यांचा कालावधी लागला आहे. अजूनही आंतरजिल्हा बदल्यांचा घोळ मिटला नसून बहुतेक शिक्षकांना सध्याच्या जिल्हा परिषदांनी सोडलेलेच अर्थात कार्यमुक्त केले नाही. दरम्यान, आता शैक्षणिक वर्ष शेवटच्या टप्प्यात असताना शिक्षकांच्या एका शाळेतून दुसऱ्या शाळेत बदल्या झाल्यानंतर त्यांची आणि विद्यार्थ्यांची देखील मोठी अडचण होणार आहे.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७९८ शाळा असून त्याअंतर्गत पहिली ते पाचवी जवळपास अडीच लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ‘आरटीई’नुसार प्रत्येक ३० विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक अपेक्षित असतो. मात्र, जिल्हा परिषदेच्या जवळपास अडीचशे शाळांची पटसंख्या १० ते २० अशी आहे. त्या शाळांवर दोन-तीन शिक्षक कार्यरत आहेत. समानीकरणाचा नियम पायदळी तुडवला जात असल्याची स्थिती आहे. काही शाळांमध्ये ६०-७० विद्यार्थ्यांसाठी एकच शिक्षक असून काही ठिकाणी बदली होऊनही नवीन शिक्षक मिळालेले नाहीत. (Four hundred teacher posts are vacant in Solapur Zilla Parishad) काही शाळांना पूर्णवेळ मुख्याध्यापक देखील नाहीत.
जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या कमी होत असून २६४ शाळांचा पट २०पेक्षा कमी झाला आहे. तरीपण, त्याठिकाणी दोन-तीन शिक्षक मंजूर आहेत. जिल्हा परिषद शाळांमध्ये ८ हजार ८२६ शिक्षकांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी तब्बल चारशे शिक्षकांची पदे सध्या रिक्त आहेत. तरीसुध्दा, बाहेरील जिल्ह्यातून शिक्षक येण्याची वाट न पाहता आपल्याकडील शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. दरम्यान, मागील पाच वर्षांत शासन स्तरावरून शिक्षक भरती न झाल्याने जिल्हा परिषद शाळांमधील रिक्तपदे वाढली आहेत. नवे शिक्षक मिळणे ही बाब तर कठीण आहेच पण आहेत त्या शिक्षकांच्या देखील बदल्या होऊन त्यांना कार्यमुक्त देखील केले जात आहे त्यामुळे शिक्षकांची संख्या आणखी कमी होताना दिसत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा