जागर न्यूज : उशिराने का होईना पण उजनी धरणाची पाणी पातळी वाढू लागली असून मागील सहा दिवसात सहा टीएमसी पाणी आले आहे, त्यामुळे पुन्हा एकदा आशा पल्लवित झाल्या आहेत.
पावसाळा सुरु होऊन महिना लोटला तरीदेखील धरणाची मायनस पातळी सुधारत नव्हती. त्यामुळे सोलापूर, धाराशिव, इंदापूर, बारामती, नगर या शहरातील नागरिकांची चिंता वाढली होती. पण, काही दिवसांपूर्वी लोणावळा, भीमाशंकर घाट माथ्यावर आणि खडकवासला धरण साखळीत चांगला पाऊस झाला. त्यानंतर मागील सहा दिवसांत पुणे जिल्ह्यातून चांगला विसर्ग धरणात आला आणि उजनीची पाणीपातळी सव्वा मीटरने वाढली. त्यामुळे त्या शहरांवरील दुबार पंपिंगचे संकट तुर्तास टळले आहे. सध्या उजनीत १८ हजार १८५ क्युसेक वेगाने पाणी धरणात येत आहे
पुणे, सोलापूर, नगर या जिल्ह्यांसाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणाने तळ गाठला होता. पण, आता धरणातील पाणीसाठा वधारू लागला आहे. त्यातून शेतकऱ्यांसह काही शहरांना दिलासा मिळाला आहे. मात्र, सोलापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या औज व हिप्परगा तलाव परिसरात अजूनही समाधानकारक झालेला नाही. त्यामुळे आगामी काही दिवसांत चांगला पाऊस न झाल्यास उजनीतून सोलापूर शहरासाठी पाणी सोडावे लागेल, अशी सद्य:स्थिती आहे. जिल्ह्यातील पेरण्याही अजून २० टक्क्यांवर गेलेल्या नाहीत.
बार्शी, पंढरपूर, करमाळा, मोहोळ, उत्तर सोलापूर, अक्कलकोट या तालुक्यांमध्ये पेरणी खूपच कमी आहे. त्यामुळे उजनी धरण १०० टक्के भरणे ही बाब शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची मानली जाते. सध्या धरणात दौंडवरून १८ हजार १८५ क्युसेक विसर्गाने पाणी येत आहे. असाच विसर्ग नियमित राहिल्यास २४ तासांत एक टीएमसी पाणी वाढते, पावसाळा सुरु होऊनही ९ जुलैपर्यंत उजनी धरण मायनस ३६.१९ टक्के होते. त्यामुळे दुबार पंपिंग सुरु करण्याची स्थिती निर्माण झाली होती. पण, लोणावळा, भीमाशंकर, खडकवासला धरणसाखळीत मुसळधार पाऊस झाल्याने उजनीत मागील सहा दिवसांत पाच टीएमसी पाणी वाढले आहे. त्यामुळे दुबार पंपिंगची चिंता आता दूर झाली आहे. अजून पावसाळा शिल्लक असल्यामुळे आशा पल्लवित झाल्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा