जागर न्यूज : पावसाळा सुरु झाल्याची जाणीव पंढरपूर तालुक्याला झाली असून, बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, पंढरपूर तालुक्यात एकाच दिवसात ११२ मिमी पावसाची नोंद झली आहे.
मागील काही दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस आता कुठे बरसू लागला आहे. मागील तीन दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरू झाला आहे. शनिवारी सलग चौथ्या दिवशी पंढरपूर शहर व तालुक्यात पावसाने हजेरी लावली. पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.शुक्रवारी एकाच दिवसात तालुक्यात ११२ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. मागील दोन महिन्यांपासून पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई जाणवू लागली आहे.
विहिरी आणि बोअरवेलची पाणी पातळी कमालीची खाली गेली आहे.त्यामुळे शेती पिके पाण्याअभावी जळू लागली आहेत. राज्यात सर्वत्र धो-धो पाऊस सुरू असला तरी सोलापूर जिल्हा मात्र अद्यापही कोरडाच आहे. जिल्ह्यात म्हणावा तितका पाऊस नसल्याने अनेक गावांत पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर सुरू करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. उजनी धरणातील पाणीसाठाही मायनसमध्ये गेल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे. अशातच आता मागील काही दिवसांपासून अनेक भागात कमी- अधिक प्रमाणात पाऊस सुरू झाला आहे. शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. सकाळपासूनच रिमझिम पावसाला सुरवात झाली. दुपारी तीनच्या सुमारास पंढरपूर व परिसरात सुमारे पंधरा मिनिटे जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले.
शनिवारी मात्र हलकासा पाऊस झाला. सलग चार दिवस सुरू असलेल्या पावसामुळे करपू लागलेल्या ऊस पिकासह फळबागांना जीवदान मिळाले आहे. अजूनही पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. शेतकरी आणखी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पंढरपूर तालुक्यात सरासरी १२.४४ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तर शुक्रवारी एका दिवसात ११२ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. सर्वाधिक पंढरपूर व कासेगाव मंडळामध्ये २१ मिलिमीटर इतका पाऊस झाला तर भाळवणी मंडळामध्ये पाऊस झाला नाही. तालुक्यातील एकूण नऊ मंडळांमध्ये शुक्रवारी एकाच दिवसात ११२ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
मंडळनिहाय शुक्रवारपर्यंत झालेला पाऊस पुढीलप्रमाणे :-
करकंब (१० मिलिमीटर), पटवर्धन कुरोली (१३ मिलिमीटर), भंडीशेगाव (१५ मिलिमीटर), भाळवणी (००), कासेगाव (२१ मिलिमीटर), पंढरपूर (२१ मिलिमीटर), तुंगत (११ मिलिमीटर), चळे (१२ मिलिमीटर), पुळूज (९ मिलिमीटर)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा