जागर न्यूज : पंढरीच्या पांडुरंगाची आषाढी आणि कार्तिकी महापूजा करण्याचा योग राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आला असून पहिल्यांदाच असा योगायोग जुळून आला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री आषाढी एकादशीची विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करीत असतात तर कार्तिकी एकादशीची महापूजा करण्याचा मान राज्याचे उप मुख्यमंत्री यांना मिळत असतो. आषाढी यात्रेनंतर कार्तिकी यात्रा होत असते त्यामुळे मुख्यमंत्री महापूजा करून गेले की कार्तिकी एकादशीची महापूजा करण्यासाठी उप मुख्यमंत्री येत असतात. विद्यमान उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून आषाढीची महापूजा केली आहे आणि यावेळी ते कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा करण्यासाठी पंढरीत येत आहेत आषाढी - कार्तिकीची विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्याचा पहिला मान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळाला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विठ्ठल पावला अशीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर २०१४ मध्ये पहिल्यांदा त्यांनी मुख्यमंत्री म्हणून विठ्ठल रुक्मिणीची आषाढीची शासकीय महापूजा केली होती.
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर २०१८ मध्ये फडणवीस यांना आषाढीच्या महापूजेसाठी पंढरपूरला येता आले नाही. मराठा बांधवांनी त्यांना प्रचंड विरोध केला होता त्यामुळे त्यांनी महापुजेला येणे टाळले होते आणि आपल्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी विठ्ठलाची महापूजा केली होती. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांनी चौथ्यांदा मुख्यमंत्री म्हणून आषाढीची शासकीय महापूजा केली.त्यावेळी त्यांनी पुढच्या वर्षी देखील मीच शासकीय महापूजेसाठी पंढरपूरला येणार असा आत्मविश्वास ही व्यक्त केला होता. दरम्यान २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक जागा मिळून देखील शिवसेनेने ऐनवेळी महाविकास आघाडी सोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे यांना संधी मिळाली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदापासून दूर राहावे लागले होते.
राज्यात अकस्मात सत्तांतर झाले आणि महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले, मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे हे विराजान झाले आणि त्यांना मुख्यमंत्री म्हणून प्रथमच २०२० मध्ये विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्याचा मान मिळाला. ठाकरे यांनी सलग दोन वर्षे मुख्यमंत्री म्हणून आषाढीची शासकीय महापूजा केली. तर ठाकरे सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांना दोन वेळा कार्तिकीची शासकीय महापूजा करण्याचा मान मिळाला. आषाढी एकादशीची शासकीय महापूजा करण्याचा मान उद्धव ठाकरे यांना पहिल्यांदाच मिळाला होता. दोन वर्षे आषाढीच्या महापूजेचा मान त्यांना मिळाला परंतु पुन्हा घडलेल्या सत्तांतराने तिसऱ्या वर्षीचा योग हुकला.
अडीच वर्षानंतर पुन्हा राज्यात सत्तांतर झाले आणि एकनाथ शिंदे यांना अनपेक्षीत मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागले. मागील जून महिन्यात आषाढीची विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्याचा प्रथमच मान मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना मिळाला. (Honor to Devendra Fadnavis for doing Mahapuja of Ashadhi Kartiki) त्यानंतर आता कार्तिकीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्याचा मान मिळाला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा