जागर न्यूज : नवऱ्याचा राग आल्याने जन्मदात्या आईने आपल्याच दोन चिमुकल्या लेकरांचा खून करून स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
राग हा किती वाईट असतो हे अनेक घटनांनी दाखवून दिले आहे. पती पत्नी यांच्यात वाद होतच असतात पण हे वाद किती टोकाला जाऊ शकतो याची अनेक धक्कादायक उदाहरणे समोर असताना नव्या मुंबईतील एक घटना काळजाचा ठोका चुकवून जात आहे. घणसोली इथं एका आईने आपल्या दोन मुलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन्ही मुलांची हत्या केल्यानंतर या महिलेनं आत्महत्येचा प्रयत्न केला पण यातून ती थोडक्यात बचावली. नवरा बायकोच्या भांडणातून तिने हे कृत्य केले असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील घणसोली परिसरात ही घटना घडली आहे. पुष्पा गुर्जर (वय 32 ) असं आरोपी आईचे नाव आहे. दिपू गुर्जर मुलगी ( वय ४ वर्ष) तर राहुल गुर्जर (वय १ वर्ष) अशी मृत मुलांची नावं आहे. पुष्पा गुर्जरचे तिच्या पतीसोबत नेहमी या ना त्या कारणावरून भांडणं होत होती. याच रागातून रविवारी रात्री तिने टोकाचे पाऊल उचलले.पुष्पाने रागाच्या भरात आपल्या दोन मुलांची चाकूने आणि ब्लेडने हत्या केली. मुलगी आणि मुलाची हत्या केल्यानंतर तिने स्वतःवर ब्लेडने वार केले. एवढंच नाहीतर पंख्याला गळफास लावून घेतला मात्र पंखा तुटल्याने तिचा जीव वाचला.
पंखा तुटल्याचा आवाज ऐकून इमारतीतील बाकीचे लोक त्याच्या घरी गेले तेव्हा ४ वर्षाची मुलगी आणि १ वर्षाचा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. शेजाऱ्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पुष्पाला तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. पोलिसांनी आई आणि मुलांना रुग्णालयात नेले. जिथे डॉक्टरांनी मुलांना मृत घोषित केले. तर आईला उपचारासाठी वाशी येथील महानगर पालिका रुग्णालयात हलवण्यात आले. रबाळे पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, वडिलांचा स्वतःचा व्यवसाय असल्याने ते घटनेच्या वेळी घरात नव्हते. मृत मुलगा राहुल याचा पहिला वाढदिवस २८ ऑक्टोबरलाच साजरा करण्यात आला होता. त्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी आई पुष्पाने रागाच्या भरात दोन्ही मुलांचा खून केला आणि स्वत: जीव देण्याचा प्रयत्न केला. (Mother killed two children due to her husband's anger) या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नवऱ्याला आलेला राग किती भयानक परिणाम करून गेल्या याचे हे एक ज्वलंत उदाहरण ठरले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा