जागर न्यूज : पैशासाठी अवघ्या पाचशे रुपयात दोन अल्पवयीन मुलींची विक्री करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली असून या प्रकारामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
कुटुंबाचे असलेली आर्थिक परिस्थिती आणि अगतिकता याचा फायदा घेऊन जव्हारमधील धारणहट्टी येथील दोन अल्पवयीन मुलींची पाचशे रुपयांमध्ये विक्री केल्याची धक्कादायक घटना घडली. मनीषा नरेश भोये आणि काळू नरेश भोये अशी या अल्पवयीन मुलींची नाव आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एका मेंढपाळाकडे मनीषा ३ वर्षांपासून तर काळू एक वर्षापासून बालमजुरी करत होती. मागील काही वर्षांपासून या दोन्ही चिमुकल्या या मेंढपाळाकडे मेंढ्यांची साफसफाई, घरगुती काम, मेंढ्यांसोबत गुराखी जाण अशा विविध कामांवर राबवल्या जात होत्या. या बदल्यात त्यांना वर्षाकाठी १२ हजार रुपये आणि एक मेंढी देण्याचं आश्वासन मेंढपाळाकडून देण्यात आलं होतं मात्र प्रत्यक्षात वर्षाला अवघे पाचशे रुपये दिले जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर या प्रकरणाची श्रमजीवी संघटनेने पुढाकार घेतला.
अखेर मुलींना खरेदी केलेल्या मेंढपाळा विरोधात जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आठ वर्षीय मनीषाचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलंय. तर सहा वर्षीय काळू भोये हिचा जव्हार पोलिसांकडून शोध सुरू आहे. या प्रकरणात तपासानंतर पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती जव्हार पोलिसांकडून देण्यात आली आहे. जव्हार मोखाडा विक्रमगड या परिसरातील अतिदुर्गम भागातील नागरिकांच्या निरक्षरतेचा आणि येथे असलेल्या बेरोजगारीच्या समस्येचा फायदा घेत येथील चिमुकल्या मुलांची खरेदी करून त्यांना वेठबिगारी म्हणून राबवला जात असल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेकडून करण्यात आला आहे.
आर्थिक परिस्थितीमुळे मुलींची विक्री आणि खरेदी करण्याचे प्रकार महाराष्ट्रात देखील घडू लागल्याचे हे धक्कादायक उदाहरण असून ही घटना उघडकीस आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. (Sale of two minor girls for five hundred rupees) गरीब कुटुंबाचा असाही गैरफायदा घेतला जात असून अशा घटना हा महाराष्ट्रासाठी धक्कादायक मानल्या जात आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा