जागर न्यूज : अलीकडे वेगवेगळी फळे, फुले विकसित होत असताना आता एकाच झाडाला वांगी, टोमॅटो आणि बटाटेही लागू लागले असून ही किमया शास्त्रज्ञांनी साधली आहे.
फळझाडात गेल्या काही वर्षांपासून विविध संशोधन करण्यात येत असून पन्नास वर्षांपूर्वी सहज मिळत असलेली फळे आज मात्र मिळत नाहीत. संकरीत उत्पादने घेणे सुरु झाल्यापासून फळांचे आकार आणि चव देखील बदलून गेली आहे परंतु मोठ्या प्रमाणात उत्पादन होऊ लागले आहे. अर्थात रासायनिक फळे खायला लोक इच्छुक नाहीत पण त्याशिवाय काही पर्यायही उरला नाही. काही लोक आपल्या बागेत अथवा टेरेसवर भाज्या पिकवू लागले आहेत. रासायनिक खतांचा वापर केलेल्या भाज्या अपायकारक ठरू लागल्या आहेत त्यामुळे अनेकांनी हा नवा मार्ग शोधला आहे. काही शेतकरी देखील घरी खाण्यासाठी वेगळ्या भाज्या पिकवत असून त्यांना रासायनिक खते, औषधे यांचा मारा करीत नाही.
सतत प्रयोग सुरु असताना वाराणसी येथील इंडियन व्हेजिटेबल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांनी नवीन तंत्रज्ञानाचा शोध लावला आहे. शास्त्रज्ञांनी त्यांच्या तंत्रज्ञानाने अशी झाडे विकसित केली आहेत, ज्यामध्ये बटाटा, टोमॅटो, वांगी आणि मिरचीचे उत्पादनही करता येते. या झाडांना ब्रिमटो आणि पोमॅटो अशी नावे देण्यात आली आहेत. पाच वर्षांच्या संशोधनानंतर एकाच रोपात कलम करून दोन भाज्या उगवण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. कलमी तंत्राने तयार केलेली झाडे किचन गार्डन किंवा पॉटसाठी योग्य आहेत. त्यामुळे तुम्ही ती तुमच्या घरी उगवू शकता असे शास्त्रज्ञ डॉ. अनंत कुमार यांनी सांगितले आहे.
पोमॅटोच्या झाडापासून २ किलो टोमॅटो आणि ६०० ग्रॅम बटाटा तयार करता येतो. बटाटे जमिनीच्या खालच्या भागात वाढतील आणि टोमॅटो वरच्या बाजूला दुसरीकडे, ब्रिमटोच्या एका रोपातून सुमारे दोन किलो टोमॅटो आणि अडीच किलोपर्यंत वांगी घेता येतात. त्याच वेळी, त्याच वनस्पतीमध्ये टोमॅटोसह मिरची, दुधी, काकडी आणि कारले देखील उगत आहे. बटाट्याचे रोप जमिनीपासून किमान ६ इंच उंच झाल्यावर त्याला टोमॅटचं झाड जोडलं जातं. पण यासाठी दोन्ही झाडांच्या देठाची जाडी समान असावी. त्यानंतर २० दिवसांनी दोन्ही एकत्र झाल्यानंतर ते शेतात सोडावे. हे झाड लावल्यानंतर दोन महिन्यांनी टॉमेटो आणि बटाटे काढू शकता.
वांग्याचं झाड लावल्यानंतर पाच दिवसांनी आणि टोमॅटोचं झाड २२ दिवसांनी कलम करावे. अशा प्रकारे, एका झाडाला दोन रोपं येऊ शकतात. अशी माहिती संशोधकांनी दिली आहे. हे एक नावेच संशोधन असून याकडे लोक कुतूहलाने पाहू लागले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा