मुंबई : दसरा मेळाव्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेला परवानगी दिली असून शिंदे गटाला जोरदार चपराक बसली आहे. शिंदे गटाची याचिका फेटाळून लावताना न्यायालयाने खडे बोल देखील सुनावले आहेत.
दसरा मेळाव्याच्या शिवतीर्थावरील परवानगीसाठी शिवसेनेकडून मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी मुंबई हायकोर्टाने दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर ठाकरे गटाला परवानगी दिली आहे. २ ते ६ ऑक्टोंबरपर्यंत ठाकरे गटाला हायकोर्टाने परवानगी दिली आहे. अर्ज नाकारण्याचा पालिकेचा अधिकार योग्य असल्याचे हाटकोर्टाने म्हटलं आहे. मात्र, पालिकेचा निर्णय वास्तविकतेला धरुन नसल्याचेही कोर्टाने म्हटलं आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा अनेक वर्ष सुरु आहे. सरकारकडून शिवाजी पार्कवर ४५ दिवस कार्यक्रमासाठी राखून ठेवलेआहेत. उच्च न्यायालयाने आपल्या निकालात नमूद केलं आहे.
आमच्या मते पालिकेनं अधिकाराचा गैरवापर केला आहे. अशा शब्दात हायकोर्टाने पालिकेला सुनावलं आहे. सदा सरवणकर यांची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. तर ठाकरे गटाच्या युक्तिवादाशी हायकोर्ट सहमत असल्याचे म्हटले आहे. खरी शिवसेना कोणाची यावर आम्ही भाष्य करत नाही. तो निर्णय अजून प्रलंबित आहे. त्यामुळे खरी शिवसेना कोणाच हा मुद्दा आजचा नाही. असेही कोर्टाने निकाल वाचण्यापूर्वी यावेळी स्पष्ट केलं.
ठाकरे गटाचा युक्तिवाद
शिवाजी पार्कवर दसरा मेळावा नेमका कोणाचा शिवसेनेचा की शिंदे गटाचा यावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी शिवसेनेसाठी ज्येष्ठ कायदेतज्ञ आस्पी चिनॉय यांनी बाजू मांडली. आमचे दोन अर्ज, २०१६ पासून आम्हाला परवानगी, मग कुणीही उठून अर्ज कसा करतोय असा युक्तिवाद चिनॉय यांनी केला. राज्य सरकारनं साल २०१६ मध्ये अद्याधेश काढलेला आहे. ज्यात राज्य सरकारनं आम्हाला दस-याच्या दिवशी मेळावा घेण्याची रितसर परवानगी दिलेली आहे. अपवाद केवळ गेल्या दोन वर्षांच्या ज्यात कोरोनामुळे तो होऊ शकला नाही. शिवसेनेचे पदाधिकारी या नात्यानं अनिल देसाई यांनी पालिकेकडे रितसर परवानगी मागितली होती. मात्र पालिकेनं कायदा सुव्यवस्थेच्या कारणास्तव ती नाकारलीय.
मी सर्व मुद्यांवर सविस्तर भूमिका मांडणार आहे. दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेणं ही शिवसेनेची परंपरा आहे. जर अचानक कुणी दुसरा तिथं त्याच दिवशी मेळावा घेतो म्हणतोय तर सारी प्रक्रिया थांबवणं अयोग्य आहे. गेली अनेक वर्ष पक्ष तिथं कार्यक्रम घेतोय तर तो त्यांचा अधिकारच आहे. कुणी दुसरा राजकीय पक्ष परवानगी मागत आलेला नाही, केवळ स्थानिक आमदार सरवण तिथं परवानगी मागत आहेत. त्यानंतर हाय कोर्टाने सवाल उपस्थित केला. २०१६ च्या आदेशांत अन्य कुणी परवानगी मागू नये असं म्हटलंय का?, नाही, तसं काही म्हटलेलं नाही असं उत्तर चिनॉय यांनी दिलं.
शिवसेनेत जल्लोष
काही झाले तरी दसरा मेळावा शिवातीर्थावरच घेणार असा निर्धार केलेल्या शिवसेनेत या निर्णयाने कमालीचा जल्लोष करण्यात येत आहे. शिवसैनिकांनी फटाके फोडून जल्लोष केला आणि आनंदाने पेढे देखील वाटले. (Shiv Sena won in Mumbai High Court) शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून शिंदे गटावर जोरदार प्रहार केला आहे.
अपील करणार !
शिंदे गट या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याची माहिती शिंदे गटाच्या वकिलांनी दिली आहे. त्यामुळे हा विषय पुन्हा चर्चेत राहणार असून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष लागणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा