जागर न्यूज : उत्तर सोलापूर तालुक्यातील कवठे ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच जैतुनबी शेख या अजूनही बेपत्ताच असून वीस दिवस उलटून गेले तरी त्यांचा तपास लागत नसल्याने रहस्य निर्माण झाले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील कवठे येथील महिला सरपंच जैतूनबी शेख भाभी या ७ सप्टेंबर पासून बेपत्ता झाल्या आहेत. बुधवारी ७ सप्टेंबर रोजी त्या दुपारच्या वेळेस शेळ्या चारायला म्हणून बाहेर पडल्या त्या परतल्याच नाहीत. भाभी शेळ्या घेवून शेतात गेल्या आणि शेळ्या परत आल्या परंतु भाभी परतल्याच नाहीत. ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच असलेल्या जैतूनबी शेख या ६५ वर्षांच्या असून त्यांच्या अचानक गायब होण्याने आणि शोध घेवूनही सापडत नसल्यामुळे चिंता वाढू लागली आहे. भाभीचे चिरंजीव सरदार शेख यांनी सलगर वस्ती पोलीस ठाण्यात याबाबत खबर दिलेली असून पोलीस देखील त्यांचा शोध घेत आहेत.
शेळ्या चारायला म्हणून गेलेल्या जैतूनबी शेख या बेपत्ता झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबात तर चिंता आहेच पण संपूर्ण गाव काळजीत आहे. कुटुंब, नातेवाइकानी त्यांचा शोध घेतला पण त्या कुठेच आढळून येत नाहीत. कवठे गावाच्या जवळ आणि शेताजवळ असलेल्या सर्व विहिरी पडताळण्यात आल्या. पाहुण्यांकडे चौकशी केली. परिसरातील गावे धुंडाळली पण तरीही जैतुनबी शेख यांचा कसलाच पत्ता लागत नाही की त्यांच्याबाबत कसलीही माहिती उपलब्ध होत नाही. सोशल मीडियावरून देखील याची माहिती आणि फोटो देण्यात आले तरीही काहीच धागेदोरे मिळून येत नाहीत. शेताच्याच रस्त्यालगत असलेल्या एका पाऊलवाटेवर एक चप्पल दिसूल आली त्यामुळे गावकऱ्यांनी जवळ असलेल्या विहिरीचे संपूर्ण पाणी उपसले पण त्यांचा शोध लागलाच नाही.
बेपत्ता भाभींना शोधताना पोलिसांनी विविध बाजूंचा तपास केला. त्यांच्या घराची झाडाझडती घेतली. गावातील लोकांकडे विचारणा केली. भाभी ज्या ठिकाणी शेळ्या चारत होत्या, तेथे चप्पल सापडल्याने पोलिसांनी सुरवातीला श्वान पथकाची मदत घेतली. गुन्हे शाखा व सलगर वस्ती पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्रित शिवाराची पडताळणी केली. पण, पोलिसांना आल्या पावली परतावे लागले. सुरवातीला या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षकांकडे होता. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी तपास केला. पण, २० दिवसानंतरही त्यांचा तपास लागला नाही. पुन्हा दैनंदिन कामकाज, बंदोबस्त, इतर गुन्ह्यांच्या तपासाचे ओझे असल्याने आता भाभींचा तपास पोलिस हवालदारांकडे सोपविण्यात आला आहे.
बेपत्ता असलेल्या भाभींचा शोध नातेवाईक देखील त्यांच्या पध्दतीने घेत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. गावचा कारभार थांबू नये म्हणून उपसरपंच आता कारभार हाकत आहेत. दरम्यान, तपास सुरुच असल्याचे पोलिस सांगतात. एका गावातून भरदुपारी महिला सरपंच बेपत्ता होते आणि पोलिसांना २० दिवसांत काहीच हाती लागत नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. ७ सप्टेंबरला भरदुपारी गावातून बेपत्ता झालेल्या सरपंचांना शोधताना पोलिसांन अद्याप यश आलेले नाही. पोलिसांनी आतापर्यंत गावातील विहिरी, शेतशिवार व त्याठिकाणी नवीन खड्डा खोदलाय का, नवीन बांधकामाच्या ठिकाणी, पंढरपूर, मोहोळ तालुक्यातील दर्गे, गोपाळपूरचा आश्रम तपासले. पंढरपूर, मोहोळ पोलिसांत बेवारस मृतदेह आढळलाय का, याची माहिती घेतली. तरीही पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही.
जैतुनबी शेख या बेपत्ता झाल्यापासून पोलीस आणि नातेवाईक त्यांचा पहिल्या दिवसांपासून शोध घेत आहेत परंतु त्यांच्याबाबत कसलाही धागादोरा पोलिसांच्या हाती लागला नाही. नातेवाईक देखील रिकाम्या हातानेच परतत आहेत. पोलिसांनी देखील सगळ्या प्रकारे तपास सुरूच ठेवला आहे तरीही त्यांच्याबाबत काहीच माहिती मिळत नसल्यामुळे त्यांचे बेपत्ता होणे हे एक रहस्य बनून गेले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा