आष्टी: 'माझ्या मुलाला मोबाईल फोन का विकलास' अशी विचारणा करीत एकाने अवघ्या चौदा वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलाचा जीव घेतल्याची घटना समोर आली आहे.
बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील नांदूर याठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका व्यक्तीनं मोबाइल विकल्याच्या कारणातून एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलाचा जीव घेतला आहे. आरोपीनं मृत मुलाला आपल्या घरी बोलावून अमानुष मारहाण केली आहे. ही मारहाण इतकी भयंकर होती की संबंधित मुलगा जागीच बेशुद्ध झाला. यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
लहू लिंबराज खिळदकर असं हत्या झालेल्या चौदा वर्षीय अल्पवयीन मुलाचं नाव आहे. तर राजू खिळदकर असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपी आणि मृत मुलगा दोघंही आष्टी तालुक्यातील नांदूर येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत लहू यानं गावातील रहिवासी असणाऱ्या राजू खिळदकर याच्या मुलाला आपला मोबाइल फोन विकला होता. 'तू माझ्या मुलाला मोबाइल फोन का विकला?' असा जाब विचारत आरोपीनं लहूला घरी बोलावलं होतं. मृत लहू १ फेब्रुवारी रोजी आरोपीच्या घरी गेला होता. यावेळी आरोपीनं लहूला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली होती. ही मारहाण इतकी भयंकर होती की, लहू जागीच बेशुद्ध पडला. या धक्कादायक घटनेनंतर त्यास अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान ३ फेब्रुवारी रोजी १४ वर्षीय मुलगा लहुची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी मृत मुलाचे वडील लिंबराज झुंबर खिळदकर यांनी अंभोरा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
लहुचा मृत्यू झाल्यानंतर हे प्रकरण अंगलट येणार हे कळताच आरोपी राजू खिळदकर फरार झाला होता. पण गुन्हा दाखल होताच अवघ्या काही तासांतच पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. केवळ मोबाइल विकल्याच्या कारणातून गावातील मुलाला अशाप्रकारे बेदम मारहाण केल्यानं परिसरात खळबळ उडाली होती. या घटनेचा पुढील तपास अंभोरा पोलीस करत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा