मुंबई : कोरोनाची तिसरी लाट लवकर निष्प्रभ होणार असल्याचे सांगितले जात होते ते सत्यात उतरताना दिसत असून कोरोनाचे नवे रुग्ण देशात घटताना दिसत आहेत.
गेल्या आठवड्यात जगभरात ३१ लाख नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. भारतामध्ये सातत्याने सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. सोबतच पॉझिटिव्हिटी रेटही घसरत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परीषद घेत याबाबतची माहिती दिली. 'मागील १४ दिवसांमध्ये देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे सक्रीय रुग्णांची संख्याही कमी होत आहे. रुग्णसंख्या कमी होत असली तरी राज्यांनी काळजी घ्यावी, ' असे लव अग्रवाल म्हणाले.
आठ राज्यात सध्या कोरोनाचे ५० हजारांपेक्षा जास्त सक्रीय रुग्ण आहेत. १२ राज्यात दहा हजार ते ५० हजार रुग्ण आहेत. तर १६ राज्यात१० हजारांपेक्षा कमी अॅक्टिव रुग्ण आहेत. सर्वाधिक सक्रीय कोरोना रुग्ण केरळ, तामिळनाडू कर्नाटक आणि महाराष्ट्रात आहेत. ३४ राज्यात साप्ताहिक रुग्णवाढ आणि पॉझिटिव्हिटी रेट घसरला आहे. यामध्ये कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, राज्यस्थानसह इतर राज्यांचा समावेश आहे. केरळमधील साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर ४७ टक्के आहे. तर मिझोरममध्ये ३४ टक्के आहे. दहा टक्केंपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट असणारे देशात २९७ जिल्हे आहेत.
लसीकरण करुन घेण्याचं आवाहनही आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आले. देशात सध्या ९६ टक्के लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर ७६ टक्के लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तसेच १५ ते १८ वयोगटातील ६५ टक्के मुलांनी पहिला डोस घेतला आहे. प्रिकॉशनरी डोसचीही संख्या मोठी आहे. आतापर्यंत १.३५ कोटी प्रिकॉशनरी डोस देण्यात आले आहेत.
गेल्या काही दिवसांत देशात कोरोना रुग्णसंख्येत घट होत आहे. गेल्या आठवड्यातील दैनंदिन रुग्णसंख्या २.०४ लाख आहे. देशात एकूण सक्रिय रुग्ण १५,३३,००० आहेत. गेल्या आठवड्यात पॉझिटीव्हीटी दर १२.९८ टक्के नोंदवण्यात आला. सक्रीय रुग्णसंख्येत महाराष्ट्र चौथ्या स्थानी आहे. राज्यात एकूण सक्रीय रुग्णसंख्या (7 दिवसांपूर्वी) - ३,०२,५७२ इतकी आहे. राज्यातील आजची सक्रीय रुग्णसंख्या १,७७,१३१ इतकी आहे. आतापर्यंत एकूण लसीकरण- १६७.८८ कोटी झाले आहे. १८ वर्षावरील लोकसंख्येत ९६ टक्के नागरिकांनी घेतली पहिली मात्रा घेतली आहे. तर, ७६ टक्के नागरिकांचे पूर्ण लसीकरण झाले आहे. तिसऱ्या लाटेतील रुग्णसंख्येचे सरासरी वय ४४ वर्षे आहे, जे यापूर्वी ५५ होते. घसादुखीचे प्रमाण २९ टक्के एवढे आहे, जे पूर्वी १६ टक्के होते. तिसऱ्या लाटेत तुलनेने गोळ्या सेवनाचे प्रमाण कमी आहे. लसीकरणानंतर मृत्यूचे प्रमाण १० टक्के (९१ टक्के सहव्याधी) लस न घेतलेल्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण २२ टक्के (८३% सहव्याधी) इतके आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने शाळा पुन्हा सुरु करण्यासाठी नियमावली/SOP जारी केली आहे. स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध करून देणे. प्रत्येक वर्गांसाठी वेगवेगळ्या वेळा असाव्यात. पालकांच्या संमतीने घरुन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यास परवानगील असावी. ११ राज्य/UTs मध्ये शाळा पूर्णपणे सुरु आहेत, १६ राज्यांमध्ये अंशतः सुरु आहेत तर ९ राज्यात पूर्णपणे बंद आहेत. देशभर सरासरी ९५ टक्के शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे, अशीही माहिती पत्रकार परीषदेत देण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा