पंढरपूर : राज्य परिवहन कर्मचारी संप अद्याप सुरूच असला तरी मंगळवेढा आगारातील २९ कर्मचारी कामावर हजर झाल्याने पंढरपूर मंगळवेढा मार्गावर लालपरी सुसाट धावू लागली असून प्रवाशांची चांगली सोय झाली आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचारी संपावर अडून असले तरी अनेक कर्मचारी रोज कामावर हजर होत असल्याने लालपरी हळूहळू का होईना पूर्व पदावर येताना दिसत आहे. या संपामुळे सामान्य प्रवाशांचे अतोनात हाल झाले असून खाजगी वाहनांची प्रवाशांची मोठी लुट केली आहे. त्यामुळे लालपरी आता मार्गावर धावताना दिसली तरी सामान्य माणसाला समाधान वाटू लागले आहे. मंगळवेढा आगारातील १६ चालक व १३ वाहक असे एकूण २९ कर्मचारी कामावर हजर झाल्याने सोलापूर व पंढरपूर मार्गावर बसेस धावू लागल्याने काहीशा प्रमाणात प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. अजूनही मंगळवेढा आगारातील
मंगळवेढ्याहून सोलापूरकडे धावणार्या बसेस -सकाळी 6.30, 7.30, 8.30, 10.30, 11.30, 12.00, 2.00, 4.00, 6.00 मंगळवेढयाहून पंढरपूरकडे जाणार्या बसेस -सकाळी 8.00, 10.00, 11.00, 12.00, 1.00, 2.00, 3.00, 5.00. अशा बसेस या दोन्ही मार्गावर धावत आहेत.
मंगळवेढा आगारातील चालक वाहक एसटी कर्मचार्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी २९ नोव्हेंबरला संपाची हाक दिली. महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्यात यावे या मागणीवर संप मिटणे अडला आहे. विलीनीकरण ही सामान्य बाब नसून ती तातडीने होऊ शकत नाही त्यामुळे हा संप अजूनही सुरूच आहे. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. मंगळवेढा आगारातील ८ चालक आणि ६ वाहक यांना बडतर्फ करण्यात आले. तर १९ जणांची अन्यत्र बदली करण्यात आली आहे. ३ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे.
मंगळवेढा आगारात एकूण ५८ बसेस असून १६ चालक आणि १३ वाहक कामावर हजर झाल्यामुळे पंढरपूर मार्गावर १६ तरसोलापूर मार्गावर १६ अशा ३२ फेर्या दैनंदिनी होत असल्याचे सांगण्यात आले आहे. अद्यापही २६ बस चालक वाहकांची प्रतीक्षा करीत आहेत. संपकरी चालक वाहकांनी २६ जानेवारी रोजी 'भीक मागो' आंदोलन केले. एसटी कर्मचार्यांनी पुकारलेला दुखवटा अद्यापही कायम असल्याचे मत आंदोलकांनी व्यक्त करीत सरकार याची दखल घेत नसल्याचा संतापही व्यक्त केला.
राज्य परिवहन महामंडळाच्या संपाबाबत आता सामान्य माणूसही नाराज आहे. राज्य परिवहन कर्मचारी तुटपुंज्या वेतनावर काम करीत असून त्यांचे वेतन वाढले जावे ही सर्वांचीच अपेक्षा आहे आणि शासनाने वेतनात मोठी वाढ देखील केली होती. यावेळीच संप आटोपता घ्यायला हवा होता पण या संपात राजकारण घुसले आणि संप अधिक चिघळला. राजकीय व्यक्ती बाजूला निघून गेल्या पण कर्मचारी लटकत राहिले आहेत. अनेकांना आत्महत्या कराव्या लागल्या आहेत तर कित्येक कर्मचारी उदरनिर्वाहासाठी अन्यत्र कामधंदा अथवा भाजीपाल्याचा व्यवसाय देखील करू लागले आहेत. या संपामुळे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंब अडचणीत आले आहे. ज्यांना बडतर्फ करण्यात आले आहे त्यांची नोकरी तर कायमची गेली आहे. संपामुळे फायदा होण्यापेक्षा तोटा होतानाच दिसत आहे आणि सामान्य प्रवाशांचे देखील हाल होत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा