लखनऊ : भामटेगिरी करताना कोण कुणाच्या नावाचा कसा वापर करील हे सांगता येत नाही, एका मुक्त पत्रकाराने केवळ जाहिरात मिळविण्यासाठी उत्तर प्रदेशच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या नावाचा गैरवापर केल्याची बाब पाच वर्षानंतर उघडकीस आली आहे.
जाहिरात मिळविण्यासाठी काय वाट्टेल ते प्रकार केले जातात पण हा प्रकार म्हणजे अगदीच धक्कादायक ठरला आहे. योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशाचे खासदार असताना २०१६ साली एका पत्रकाराने त्यांच्या नावाचा खोटा मेल आय डी बनवून आणि त्यांच्या नावाचा गैरवापर करून अनेकांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार पाच वर्षानंतर उघडकीस आला आहे आणि अवघ्या पत्रकारिता विश्वात खळबळ उडाली आहे. २०१६ साली खासदार असणाऱ्या योगी आदित्यनाथ यांच्या नावे बोगस ई मेल पाठवून लुबाडणूक केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. योगी आदित्यनाथ हेच जणू आपल्या वर्तमानपत्राला जाहीरात देण्यासाठी शिफारस करत आहेत, असा बनाव त्याने रचला आणि अनेक संस्थांना जाहीराती देण्यासाठी भाग पाडण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून आलं आहे.
उत्तर प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे त्या काळी लोकसभेचे खासदार होते. फ्री लान्स पत्रकार मनोज कुमार सेठ याने योगी आदित्यनाथांच्या नावाचा गैरवापर करून स्वतःच्या वर्तमानपत्रासाठी जाहीरात मिळवण्याचा डावा आखला. त्यासाठी त्याने योगी आदित्यनाथ यांच्या नावे एक बोगस ई मेल तयार केला. yogiadityanath.mp@gmail.com या नावाने विविध संस्थांना ई मेल करून आपल्या संस्थेला जाहीरात देण्याची सूचना त्यावरून केली. मात्र वारंवार हे प्रकार घडू लागल्यामुळे योगी आदित्यनाथ यांच्या सहकाऱ्यांना संशय आला आणि चौकशी सुरू करण्यात आली.
खासदार योगी आदित्यनाथ यांच्या बोगस ई मेलचा वापर करून मुक्त पत्रकार मनोज कुमारनं मोठ्या संस्थांना मेल पाठवायला सुरुवात केली. पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन, ओएनजीसी, गेल यासारख्या संस्थांनाही त्याने मेल पाठवले आणि जाहीरात देण्याची सूचना केली. योगी आदित्यनाथ यांनी सही केलेले बोगस लेटरहेड अर्जाचाही स्कॅन कॉपीदेखील त्याने सोबत जोडली होती. ज्यावेळी पोलिसांनी ई मेल आयडीचा तपास केला, त्याचवेळी तो बोगस असल्याचं सिद्ध झालं. त्यावरून हा बनावट ईमेल आयडी तयार करण्यामागचा उद्देशही पोलिसांच्या लक्षात आला. हे सर्व ईमेल तयार झालेल्या पीसीचा आयपी ऍड्रेस, ज्या वर्तमानपत्रासाठी जाहीरात मागण्यात आली होती, त्याचा संस्थापक असे सगळे धागेदोरे पत्रकार मनोज कुमार सेठपर्यंत पोहोचत असल्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पत्रकार मनोजने आपला गुन्हा कबूल केला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा