सोलापूर : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप अधिकच ताणाला जात असताना सोलापूर विभागातील ११ कर्मचारी बडतर्फ करण्यात आले आहेत. या अकरा कर्मचाऱ्यात पंढरपूर आगारातील तीन जणांचा समावेश आहे.
राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी आपल्या मागण्यावर अद्यापही ठाम असून २७ ऑक्टोबर पासून हा संप सुरु आहे. शासनाने त्यांना पगारवाढ घोषित केली पण त्यांनी संप मागे घेतला नाही. अर्ध्यावर कर्मचारी कारवाईच्या भीतीने कामावर हजर झाले आहेत पण अजूनही अनेक कर्मचारी संपत सहभागी आहेत. या संपामुळे सामान्य प्रवाशांचे अतोनात हाल सुरु असून खाजगी वाहने त्यांची हवी तशी लुट करीत आहेत. भरघोस वेतनवाढ दिली परंतु शासनात विलीनीकरण व्हावे हीच आता त्यांची प्रमुख मागणी आहे. शासनाने अनेकदा त्यांना कामावर येण्याचे आवाहन केलेले आहे परंतु हा संप अद्याप पूर्णपणे संपला नाही आणि परिवहन महामंडळाने त्यांच्यावर कारवाईचे हत्यार उपसायला सुरुवात केली आहे. सुरुवातीला निलंबन आणि नंतर बडतर्फीची कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार सोलापूर विभागारील ११ कर्मचारी बडतर्फ केले आहेत.
राज्य परिवहन महामंडळाने केलेल्या या कारवाईत सोलापूर आगारातील ११ तर पंढरपूर आगारातील ३ कर्मचारी बडतर्फ केले आहेत. ३१ कर्मचाऱ्यांना करणे दाखवा नोटीस देण्यात आली असून आणखी काही कर्मचाऱ्यावर अशा प्रकारची कारवाई करण्याच्या हालचाली सुरु आहेत. सोलापूर जिल्ह्यातील ९ आगारात ३ हजार ९०० कर्मचारी असून यातील ६०० कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. बाकीचे कर्मचारी अजूनही संपावर असून त्यांच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया महामंडळाने सुरु केली आहे ३१ कर्मचाऱ्यांना नोटीसा देण्यात आल्या असून त्याद्वारे खुलासा मागितला आहे. त्यामुळे आता या ३१ जणांवरही बडतर्फीची कारवाई होण्याची अधिक शक्यता आहे. दरम्यान या संपामुळे सामान्य आणि गरीब वर्गातील प्रवाशांचे हाल होत असून खाजगी वाहनांकडून लुट देखील होत आहे त्यामुळे हा संप लवकर मिटण्याची प्रतीक्षा लागली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा