मुंबई : शिवसेना कार्याध्यक्ष आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि सामना च्या संपादिका रश्मी ठाकरे यांच्याबद्धल भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने आक्षेपार्ह वक्तव्य करण्याचे धाडस केले असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरु झाली आहे
राजकारण किती खालच्या पातळीला गेले आहे हे अनेक वेळा समोर येत आहे. भारतीय जनता पक्षाची राज्यातील सत्ता गेल्यापासून तर भाजपचे काही नेते आणि काही पदाधिकारी बावचळून गेल्यासारखे वागताना दिसत आहेत. इतर पक्षापेक्षा वेगळा असल्याचा ढोल वाजवीत असलेल्या या पक्षातील अनेक नेत्यांच्या जीभा एवढ्या सैल सुटल्या आहेत की त्याना भारतीय संस्कृतीचा विसर पडला आहे असे चित्र निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपातील सामान्य पदाधिकारीही वाट्टेल तशी टीका करतात पण ठाकरे यांनी हे सगळे संयमाने घेतले आहे . राजकीय टीकाटिपण्णी होणे स्वाभाविक आहे पण उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना टार्गेट करण्यात येऊ लागले आहे.
वास्तविक रश्मी ठाकरे या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी असल्या तरी त्या कधीही राजकीय टिपण्णी करीत नाहीत. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी अनेकदा राजकीय शेरेबाजी केलेली आहे पण रश्मी ठाकरे राजकारणाच्या दलदलीत आलेल्या नसताना त्यांच्याविषयी भाजपचे पदाधिकारी जितेन गजारिया याने काही आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयीही हा गजरिया याने ट्विटरवर आक्षेपार्ह वक्तव्यं केलेले आहे. रश्मी ठाकरे यांच्याविषयी असे वक्तव्य केल्याने शिवसेना आणि महाविकास आघाडीतील नेते, कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. भाजपला सत्ता न मिळाल्याने त्यांना पोटशूळ उठल्यासारखे झाले आहे अशा संतप्त शब्दात प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान हे प्रकरण पोलिसात गेले असून पोलिसांनी भाजपच्या जितेन गजारिया याला नोटीस दिली असून त्याला ताब्यात घेण्यात आल्याचे समजते. भाजप पदाधिकाऱ्याच्या अशा वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण गढूळ झाल्याचे समोर आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा