सोलापूर : कोरोनाची तिसरी लाट सुरु असली तरी दहावी आणि बारावी परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार असून कोरोनाबाधित विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा स्वतंत्रपणे घेण्यात येणार आहे परंतु यासाठी कोरोना अहवाल अथवा सक्षम वैद्यकीय अधिकारी यांचा दाखला आवश्यक असणार आहे.
कोरोनाची तिसरी लाट नुकतीच सुरु झाली असून नुकत्याच सुरु झालेल्या शाळा बंद पडल्या आहेत. शाळा सुरु करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला असला तरी स्थानिक पशासनावर त्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. स्थानिक प्रशासन शाळा सुरु करण्याच्या मानसिकतेत दिसत नाही त्यातच दहावी बारावी परीक्षेचे काय होईल या संभ्रमात पालक आणि विद्यार्थीही आहेत . दहावी आणि बारावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसारच होतील अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात येत आहे त्यामुळे या परीक्षा ठरलेल्या वेळेत होतील असे संकेत मिळत आहेत. परंतु परीक्षेपूर्वी अथवा परीक्षा सुरु असतानाच दहावी आणि बारावीचे विद्यार्थी कोरोना बाधित झाले तर काय करायचे हा प्रश्न होताच. त्याचाही आता निर्णय घेण्यात आला असून अशा विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्रपणे पुरवणी परीक्षा घातल्या जाणार आहेत.
संपूर्ण राज्यभर कोरोनाचा संसर्ग वाढ असून अठरा वर्षे वयाच्या आतील मुलानाही कोरोनाची लागण होताना दिसत आहे. पंधरा ते अठरा वर्षे वयाच्या मुलांचे लसीकरण करण्यात येत असून शाळा सुरु झाल्यावर शाळांमधून लसीकरण केले जाईल पण परीक्षेच्या पूर्वी मुले बाधित झाली आणि त्यांना परीक्षा देता आली नाही तर नियमित परीक्षा झाल्यानंतर त्यांच्यासाठी स्वतंत्रपणे पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे. परतू यासाठी संबंधित विद्यार्थ्याचा कोरोना तपासणीचा अहवाल किंवा सक्षम वैद्यकीय अधिकारी यांचा दाखला मुख्याध्यापकांच्या मार्फत शिक्षणाधिकारी यांच्याकडे सदर करणे आवश्यक असणार आहे. याबाबतचा प्रस्ताव लवकरच शासनाकडे पाठविला जाणार आहे.
दहावी-बारावीची परीक्षा नियोजित वेळेतच घेण्याचे नियोजन आहे. कोरोना बाधित विद्यार्थ्यांची आणि नियमित परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची एकत्रितपणे पुरवणी परीक्षा होईल. बाधितांची संख्या अधिक असल्यास नियमित व पुरवणी परीक्षेचा निकाल एकत्रित जाहीर होईल. जेणेकरून त्यांचे वर्ष वाया जाणार नाही. अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे. त्यामुळे दहावी आणि बारावी विद्यार्थी कोरोनाबाधित झाला तरी त्याचे वर्ष वाया जाणार नाही ही दहावी बारावी विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बाब आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा