नवी दिल्ली : जगाची झोप उडवून दिलेल्या कोरोना महामारीचा शेवट जवळ आल्याची दिलासादायक माहिती समोर आली असून आता लॉकडाऊन सारखे उपाय करण्याचीही गरज पडणार नाही.
गेल्या दोन वर्षापासून भारतालाच नव्हे तर जगाला हैराण केलेल्या या न दिसणाऱ्या विषाणूने प्रचंड नुकसान केले आहे आणि अजूनही करीतच आहे. सलग दोन वर्षे माणसांचं जगण कोरोनाने कठीण केले आहे. कोरोना परतीच्या मार्गावर आहे असे वाटत असतानाच तो चोर पावलाने घुसला आणि तिसऱ्या लाटेच्या रुपात नव्या जोमाने समोर आला त्यामुळे पुन्हा निराशा बळावत चालली असताना दिलासा देणारी माहिती समोर आली. ' द लॅन्सेट' ने प्रकाशित केलेल्या अहवालात याबाबत सांगण्यात आले असून कोरोनाचे संक्रमण सुरूच राहील पण महामारीचा मात्र अंत जवळ आला आहे असे सांगण्यात आले आहे.
कोरोनाची तिसरी लाट सुरु झाली असली तरी भारतातील आणि विदेशातील अनेक संशोधकांनी आणि अभ्यासकांनी याआधीही याबाबत भाष्य केले असून कोरोनाची तिसरी लाट लवकरच परतीच्या मार्गावर निघेल असे सांगितले असतानाच हा नवा अहवाल प्रकाशित झाला आहे.सध्या ओमिक्रॉनमुळे कोरोनाची तिसरी लाट आली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. ओमिक्रॉनची लाट गेल्यानंतर देखील कोरोना होईल. पण, महामारी येणार नाही. कोरोना सर्दी-खोकल्यासारखा वारंवार होणार आजार असेल. पण, त्याला आवर घालण्यासाठी आरोग्य यंत्रणांना योग्य ते व्यवस्थापन करावे लागेल. सरकारने कोरोनाला आवर घालण्यासाठी लॉकडाऊनसारखे उपाय केले होते. ते आता करावे लागणार नाहीत, असंही या अहवालात सांगण्यात आले आहे.
कोरोना विषाणूचं संक्रमण सुरूच राहील. तसेच लसीकरणामुळे मिळालेली रोगप्रतिकारशक्ती कमी होताच कोरोनाचा होण्याचा धोका असेल. देशात हिवाळ्यात सर्वाधिक संक्रमणाची शक्यता आहे. पण, विषाणूचा प्रभाव कमी असेल. कोरोना लसी, आधीच अनेक लोकांना होऊन गेलेला संसर्ग यामुळे कोरोनाचे आरोग्यवर कमी परिणाम होतील. तसेच मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग पाळून आपण कोरोनाच्या येणाऱ्या लाटांमध्ये संरक्षण करू शकतो, असंही या अहवालामध्ये म्हटलं आहे.
काही देशांमध्ये अद्याप ओमिक्रॉनची लाट आलेली नाही. अशा देशांमध्ये देखील ओमिक्रॉनची रुग्णसंख्या वाढून लवकरच पीक येण्याची शक्यता आहे. त्याला आवर घालण्यासाठी कोरोनाच्या चाचण्या करणे गरजेचे आहे. तसेच ओमिक्रॉन संसर्गाचा वेग आणि तीव्रता लक्षात घेता कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व्यर्थ असल्याचेही या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. कोरोनाने जरी पुन्हा निराशा आणली असेल तरी आता नव्याने दिलासा मिळू लागला असून अनेक तज्ञांचे यावर एकमत असल्यामुळे कोरोनाची महामारी लवकरच हद्दपार होईल आणि किरकोळ सर्दी पडशासारखा कोरोना सामान्य होऊन जाईल अशी आशा आता दृष्टीपथात आली आहे.
वाचा : पंढरीच्या गुंडांना घाम फोडणारे बनले पोलीस महासंचालक !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा