मुबई : मला परमबीर सिंग यांचे 'परम सत्य' उघड करायचे आहे, त्यांचे सत्य मला सांगायचे आहे, त्यासाठी परवानगी द्यावी अशी खळबळजनक मागणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.
राष्ट्रवादीने नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना शंभर कोटी वसुलप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची चांदिवाल आयोगाच्या समोर चौकशी करण्यत येत आहे. या चौकशीवेळी अनिल देशमुख यांनी आयोगाकडे ही परवानगी मागितल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासंदर्भात देशमुख यांनी मोठे विधान केल्याने महाराष्ट्राचे लक्ष आता याकडे लागले असून देशमुख हे परमवीर सिंग यांच्याबाबत काय धमाका करताहेत याची उत्सुकता ताणली गेली आहे.
देशमुख यांच्या परवागीच्या मागणीने परमबीर सिंग अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच सचिन वाझे यांचे वकील नायडू यांनी वारंवार पोलीस सह आयुक्त मिलिंद भारंबे यांचे नाव घेऊन प्रश्न विचारल्याने आगामी सुनावणीस आयोग पोलीस सह आयुक्त मिलिंद भारंबे यांना जबाबाकरता साक्षीकरता बोलावणार असल्याचे देखील बोलले जात आहे. यामुळे आता परमबीर सिंग यांच्याबाबत काय काय रहस्ये बाहेर येताहेत याकडे लक्ष लागणे स्वाभाविक आहे. चांदीवाल आयोगासमोर गेल्या काही दिवसांपासून अनिल देशमुख यांची उलट तपासणी सुरु आहे. यावेळेस सचिन वाझे यांचे वकील नायडू हे अनिल देशमुख यांची उलट तपासणी करत आहेत.
या उलट तपासणी वेळी अनिल देशमुख यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले त्यावेळेस अनिल देशमुख यांनी हे खुलासे केले आहेत. अनिल देशमुख यांनी त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नात अंकित आनंद आणि सलील देशमुख यांच्या नावाबद्दल आक्षेप घेतला मात्र आयोगाने विनंती फेटाळली.प्रश्नोत्तर संपल्यावर अनिल देशमुख यांनी 'मला परमबीर यांचे परमसत्य आयोगाला सांगायचे आहे' परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे. यावर आयोगाने अनिल देशमुख यांना कायदेशीररित्या प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितले आहे. यामुळे आता अनिल देशमुख प्रतिज्ञापत्र सादर करतील, त्यात काय महत्वाचे खुलासे आहेत आणि काय 'परमसत्य' आहे हे बाहेर येईल परंतु अनिल देशमुख यांच्या या मागणीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा