पुणे : महाराष्ट्रातील थंडीचा कडाका आणखी वाढणार असून उत्तर भारतातील तीव्र थंडीच्या लाटेचा मोठा फटका महाराष्ट्राला बसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे त्यामुळे पुढील पाच दिवस राज्यासाठी काळजी घेण्याचे ठरणार आहेत.
हिवाळ्याचे दिवस अखेरच्या टप्प्यात आले असताना थंडीचा जोर वाढू लागला आहे. राज्याच्या काही भागात तर थंडीची लाट आहे आणि ही थंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे. विशेषत:, उत्तर-मध्य महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांत पुढील दोन ते तीन दिवस शीतलहर (थंडीची तीव्र लाट) येणार आहे. या भागात किमान तापमान ७ ते ८ अंश सेल्सिअस एवढे खाली येईल, असा अंदाज हवामान विभागाचे डॉ. अनुपम कश्यपी यांनी वर्तविला आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील सर्वच शहरांचे किमान तापमान उणे ०.७ अंशापासून ७.२ अंश सेल्सिअस एवढे खाली घसरले आहे, तर कमाल तापमानदेखील उणे ६.४ अंशांपर्यंत घसरण झाली आहे. सर्वच भागदेखील चांगलाच गारठणार आहे. राज्यातील उत्तर-मध्य महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांत पुढील दोन ते तीन दिवस शीतलहर येणार आहे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
शीतलहरीमुळे या भागातील किमान तापमान ७ ते ८ अंश सेल्सिअसच्या खाली येईल. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे. मुंबईसह मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात पुढील चार ते पाच दिवस थंडीचा कडाका कायम राहणार आहे. दरम्यान, पुणे आणि मुंबई या शहरांवर रविवारी जमा झालेले धूलिकण पूर्णपणे कमी झाले आहेत. स्थानिक वातावरणातील बदलामुळे धूलिकण तयार झाले होते, अशी माहिती हवामान विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली आहे.
काही दिवसांपासून पंजाब आणि आसपासच्या भागांवर पश्चिमी चक्रवाताबरोबर चक्रीय स्थिती आहे. तसेच पंजाब, झारखंड, उत्तर कर्नाटकमध्ये अशीच स्थिती आहे. याचबरोबर २९ जानेवारीला पश्चिम हिमालयाच्या पायथ्यावर आणखी एक नवीन पश्चिमी चक्रवात घोंघावणार आहे. या सर्व स्थितीमुळे मंगळवारपासून मध्य आणि ईशान्य भारतातील पंजाब, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, गुजरात, सौराष्ट्र, कच्छ, छत्तीसगड, मध्य प्रदेश भागातील पश्चिमी भागात थंडीची तीव लाट (शीतलहर) येणार आहे. ही लाट पुढील पाच दिवस राहणार असून, किमान तापमानाचा पारा ३ ते ५ अंश सेल्सिअस एवढा खाली येईल. थंडीच्या तीव्र लाटेबरोबरच दाट धुके राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी विशेषत: जेष्ठ नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा